कर्जफेडीसाठी मंगळवेढय़ातील २३५ वर्षांपूर्वीचा व्यवहार उजेडात

कर्जाची परतफेड करण्यासाठी कोणी जमीन विकतो तर, कोणी दागिने. पण, देणेकऱ्यांचा तगादा चुकविण्यासाठी एका शास्त्र्याने दुर्मीळ हस्तलिखिते वेदशास्त्रसंपन्न विद्वानाला विकून कर्जफेड केल्याची २३५ वर्षांपूर्वीची घटना एका पावतीमुळे उजेडात आली आहे. संतांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे हा व्यवहार झाला होता.

रघुनाथ धनंजय हे या कर्जबाजारी शास्त्र्याचे नाव. वैदिक संहितेची अडीच अष्टके, वेदपाठाची अडीच अष्टके आणि दोन पंचिका असे दुर्मीळ हस्तलिखित ग्रंथ शके १७०२ मध्ये म्हणजेच इ.स. १७८० साली त्यांना कर्जफेडीसाठी वेदशास्त्रसंपन्न श्रीधर भट कुबारे यांना सात रुपयांत विकावे लागले होते. कर्जाची परतफेड करण्याची शक्ती नसल्याने हे ग्रंथ विकावे लागत असल्याची कबुली व्यवहाराच्या पावतीद्वारे त्यांनी दिली आहे. दुर्मीळ हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांना ही पावती नुकतीच सापडली आहे.

या कागदाचे मंगळवेढा येथील कानभट्ट जोशी हे ‘साक्षी’ म्हणजेच साक्षीदार आहेत. एका विचित्र स्वरूपातील आणि तत्कालीन मजकुरातील ही एक प्रकारची ‘प्रॉमिसरी नोट’ आहे, असेही मंजूळ यांनी सांगितले.

अवघेनव्हे तर तब्बल

ही दुर्मीळ हस्तलिखिते विकून तब्बल सात रुपये या शास्त्र्याने मिळवले होते. आजच्या काळात सात रुपये हे ‘अवघे’ वाटत असले तरी आजच्या शंभर रुपयांचे मोल १९४० साली १६ हजार ३५७ रुपये होते, हे लक्षात घेतले तर २०० वर्षांपूर्वीच्या सात रुपयांचे मोल ‘तब्बल’ मानाचेच होते!

‘हे ग्रंथ सात रुपये किमतीला स्वखुशीने दिले आहेत. त्यासंबंधी भाऊबंद तक्रार किंवा कज्जा करतील, तर त्याचे आम्ही पाहून घेऊ. या व्यवहारात कोणाचाही बोलण्याचा संबंध नाही. आमच्या वडिलांच्या नशिबाची (सुक्रत सही) ग्वाही देऊन ही पावती शके १७०२ शार्वरिनाम संवत्सरास देत आहे,’ असे पावतीवर नमूद आहे.