News Flash

ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे पीएमपीच्या अडीचशे गाडय़ा बंद

खासगी ठेकेदारांकडून घेतलेल्या भाडे तत्त्वावरील गाडय़ांचे लाखो रुपये थकल्यामुळे ठेकेदारांनी त्यांच्या २५० गाडय़ा शनिवारी बंद ठेवल्या.

| June 2, 2013 02:50 am

खासगी ठेकेदारांकडून घेतलेल्या भाडे तत्त्वावरील गाडय़ांचे लाखो रुपये थकल्यामुळे ठेकेदारांनी त्यांच्या २५० गाडय़ा शनिवारी बंद ठेवल्या. या प्रकारामुळे ठेकेदारांना देण्यासाठी पीएमपीकडे निधी नसल्याचे स्पष्ट झाले असून गाडय़ा मार्गावर न आल्यामुळे पीएमपीवरही नामुष्की ओढवली आहे.
पीएमपीने सात ठेकेदारांकडून २७२ गाडय़ा भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. त्यांचे पैसे दरमहा दिले जातात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदारांचे पैसे थकले आहेत. त्यांनी वारंवार मागणी करून तसेच पत्रे देऊनही पीएमपी प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेर ठेकेदारांनी शनिवारी गाडय़ा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २७२ पैकी २५० गाडय़ा शनिवारी मार्गावर आल्या नाहीत. त्यामुळे पीएमपी प्रवाशांची गैरसोय झाली तसेच पीएमपीचेही २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ठेकेदारांनी गाडय़ा बंद ठेवल्यानंतर अखेर प्रशासनाने पैसे थकवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे आणि पीएमपीचे संचालक, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी संबंधित सर्वाची तातडीने बैठक बोलावली. आम्ही गाडय़ा बंद ठेवल्या म्हणजे आम्ही संप केलेला नाही. मात्र, वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे आम्हाला आमच्या चालकांचे तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे पगार करणे आता अशक्य होत आहे. तसेच गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती करणे देखील शक्य होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी आम्हाला आमची बिले मिळणे आवश्यक आहे. ते पैसे मिळाल्यानंतर आम्ही गाडय़ा रस्त्यावर आणू, अशी भूमिका ठेकेदारांनी बैठकीत मांडली.
ठेकेदारांचे जे पैसे थकले आहेत ते सात दिवसांत दिले जातील, असे आश्वासन तांबे आणि जगताप यांनी बैठकीत दिले. या आश्वासनानंतर रविवारपासून गाडय़ा रस्त्यावर आणू असे ठेकेदारांनी सांगितले. पीएमपीच्या ताफ्यात सध्या १,१५० गाडय़ा सध्या मार्गावर आणल्या जात असून २७२ गाडय़ा भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 2:50 am

Web Title: 250 pmp buses not in service
टॅग : Pmp
Next Stories
1 पुण्यातील व्यावसायिकांना शिवसेनेची सात जूनपर्यंत मुदत
2 कागदापासून पिशव्या बनवण्याचे कारागृहात संजय दत्तला काम
3 विकास आराखडय़ाच्या विरोधात भाजपतर्फे आजपासून अभियान
Just Now!
X