येरवडय़ातील लक्ष्मीनगर भागात दफनभूमीची संरक्षक भिंत घरावर पडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून दोन महिलांना जखमी अवस्थेत अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही भिंत खचून पडली.
आनंद भिलोरे (वय ६५), सुधाकर आनंदा भिलारे (वय ४०), आकाश भिलोरे (वय ११) आणि पल्लवी (वय ६) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शांताबाई आनंद भिलोरे (६५) संगीता सुधारक भिलोरे (वय ३५) या दोघी जखमी आहेत. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील लक्ष्मीनगर येथे दफनभूमीची संरक्षक भिंत आहे. या भिंतीची उंची पंधरा ते वीस फूट असून रुंदी दोन फूट आहे. या भिंतीच्या पाठीमागे लोकांनी पत्र्याच्या झोपडय़ा राहण्यासाठी बांधलेल्या आहेत. भिलोरे यांच्या दोन खोल्या असून बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुसळधार पावसामुळे ही भिंत खचून घरावर पडली. पाठीमागील खोलीत आनंद, सुधाकर, आकाश आणि पल्लवी हे झोपले होते, ते सर्व जण दगडांखाली दबले. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलास फोन करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळाकडे जाण्यास रस्ताच नसल्यामुळे पंधरा ते वीस मिनिटे पोहोचण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत नागरिकांनी महिलांना बाहेर काढले.
भिलोरे यांच्या शेजारी राहणारे सागर धीरज सिंग यांनी सांगितले की, भिंत पडल्याचा आवाज आल्यानंतर सर्व जण धावत आले. बाहेरील खोलीत असलेल्या दोन महिला लाकडी कपाटाच्या खाली होत्या. त्यांना बाहेर काढले. पाऊस सुरू होता आणि विजेची वायर तुटून पाण्यात पडली होती. त्यामुळे कोठेही हात लावला तरी विजेचा झटका लागत होता. अग्निशामक दलाचे जवान आल्यानंतर त्यांनी वीज पुरवठा बंद करण्यास सांगून पाठीमागील खोलीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. सुधाकर यांचे वडील पुण्यात काही दिवासांपूर्वीच आले होते. दोन्ही महिला बाहेरच्या खोलीत असल्यामुळे वाचल्या. सुधाकर हा एका हॉटेलमध्ये कामाला होता. भिलोरे कुटुंबीय हे मूळचे जवळगावचे आहे.