ललित साहित्याचा वाचक अवघा १० टक्के; वैचारिक लेखन, चरित्र-आत्मचरित्र वाचनालाही पसंती

ललित साहित्याकडून वाचकांचा कल आता विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुस्तकांच्या वाचनाकडे वळाला आहे. माहितीपर पुस्तकांवर ४० टक्के वाचकांनी प्राधान्यक्रमामध्ये पसंतीची मोहोर उमटवली आहे. त्यानंतर वैचारिक लेखन, चरित्र-आत्मचरित्र वाचनाला पसंती असून ललित साहित्याचा वाचक अवघा दहा टक्के उरला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेल्या वाचकांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे. परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान केले जातात. या प्रक्रियेमध्ये परिषदेने यंदा प्रथमच वाचकांनाही सामावून घेतले. आपल्याला आवडलेले पुस्तक वाचकांनी कळविण्याचे आवाहन परिषदेने केले होते. पुरस्कार निवड समितीने वाचकांनी केलेल्या शिफारशींचा विचार करूनच पुरस्कारयोग्य पुस्तकाची निवड करण्यात आली.

परिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत १ हजार ७ वाचकांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. ९७२ वाचकांनी ई-मेलद्वारे त्यांच्या पसंतीच्या पुस्तकाचे नाव कळविले. तर, ३५ वाचकांनी पत्रे पाठविली.  त्याचे सर्वेक्षण करून परिषदेने वाचकांच्या अभिप्रायाचा कल अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. ई-मेलवरून इतक्या संख्येने पसंती आली याचा अर्थ वाचक तंत्रज्ञानाभिमुख आहेत, असा निष्कर्ष काढता येतो, याकडे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी यांनी लक्ष वेधले. प्रतिसाद देणाऱ्या वाचकांमध्ये ६० टक्के पुरुष असून ४० टक्के महिलांचा समावेश आहे. प्राधान्यक्रमाची पसंती घेताना वाचकांचा वयोगट घेण्यात आलेला नाही, पण, ई-मेल वापरणाऱ्या वाचकांची मोठी संख्या ध्यानात घेता हे वाचक हे युवा पिढीतील आणि मध्यमवयीन असावेत, असे म्हणता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.  तब्बल ४० टक्के वाचकांनी माहितीपर पुस्तकांची नावे पुरस्कारासाठी कळविली आहेत. तर, २८ टक्के वाचकांनी वैचारिक साहित्याला प्राधान्य दिले. चरित्र आणि आत्मचरित्र वाचनाकडे २१ टक्के वाचकांचा कौल असल्याचे निष्पन्न झाले आहे. कथा, कविता, कादंबरी आणि प्रवासवर्णने अशा ललित साहित्यातील आवडीच्या पुस्तकांची नावे केवळ दहा टक्के वाचकांनी कळविली आहेत. समीक्षापर पुस्तकांची संख्या कळविणाऱ्या वाचकांची संख्या अवघा एक टक्का एवढीच आहे, असे जोशी यांनी सांगितले.

माहितीपर पुस्तके म्हणजे काय?

माहितीपर पुस्तकांमध्ये आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध विषयांचा समावेश होतो. संगणकाचा वापर, सेंद्रिय शेती कशी करावी, गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, आर्थिक नियोजनाचे स्वरूप, पर्यटनाला कुठे आणि कधी जावे, व्यवस्थापनशास्त्राची कौशल्ये आणि मुलांचे संगोपन अशा जीवनविषयक विविध विषयांचा माहितीपर पुस्तकांमध्ये अंतर्भाव होतो.