बायोमेट्रीक यंत्रणा, व्हिडीओ चित्रीकरणाचा वापर * पोलीस शिपाई पदाच्या २१३ जागांसाठी ४६ हजार उमेदवार

पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या २१३ जागांसाठी राज्यभरातील ४६ हजार ६७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोलीस दलातील भरती प्रक्रियेस शिवाजीनगर येथील कवायत मैदानावर सोमवारपासून सुरुवात  झाली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी  पोलिसांकडून बायोमेट्रीक यंत्रणा, व्हिडीओ चित्रीकरणाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रि या अधिक पारदर्शी होणार असून काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलिसांना तत्काळ कारवाई करणेदेखील शक्य होणार आहे.

पोलीस भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार शिवाजीनगर मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर दाखल झाले असून सोमवारपासून भरती प्रक्रि येस सुरुवात झाली आहे. पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांच्या २१३ जागांसाठी यंदा राज्यभरातील ४६ हजार ६७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. एकेकाळी पोलीस दलात भरती होण्याचे प्रमाण कमी होते. त्यातुलनेत अन्य सरकारी कार्यालयांत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवार प्रयत्न करत असत. गेल्या काही वर्षांपासून अन्य सरकारी विभागातील भरती प्रक्रि या जवळपास थांबली असून अनेक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्यात येत आहे. पोलीस दलात हक्काची नोकरी मिळण्याची आशा असल्याने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडय़ातील अनेक तरुण पोलीस दलात भरती होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. शारीरिक तसेच बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करणारे अनेक खासगी क्लास तसेच पुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पोलीस दलात भरती होणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

यासंदर्भात पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी म्हणाले, राज्यभरातील उमेदवारांनी पुणे पोलीस दलातील पोलीस शिपायांच्या जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारपासून पोलीस कवायत मैदानावर चाचणी होणार आहे. शासकीय सुट्टी वगळता सहा एप्रिलपर्यंत मैदानी चाचणी सुरू राहणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. मैदानी चाचणी ६ एप्रिलपर्यंत होणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या २१३ जागांसाठी  ४६ हजार ६७० उमेदवारांकडून  अर्ज दाखल करण्यात आले आहेत. २०१६ मध्ये पार पडलेल्या पोलीस भरतीत लेखी परीक्षेत काही उमेदवारांनी तोतयांना (डमी) बसविले होते. त्यावेळी डमी उमेदवार तसेच गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून बायोमेट्रीक यंत्रणा, मैदानी चाचणी स्पर्धेचे व्हिडीओ चित्रीकरण तसेच स्थिर छायाचित्रकरण यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

पोलीस भरतीसाठी साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर शासकीय सुट्टी वगळून सहा एप्रिलपर्यंत मैदानी चाचणी स्पर्धा होणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. पोलीस भरतीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, ४५ पोलीस निरीक्षक, साडेचारशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.