हरित पट्टय़ातील ५०० वृक्षांची कत्तल; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र नाराजी

शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखडय़ातील हरित पट्टय़ाचे आरक्षण निवासी करण्यात आल्यानंतर शहरातील हिरवाईवर घाला घालण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणीनगर येथील हरित पट्टय़ात असलेल्या ५०० वृक्षांची तोड एका बांधकाम व्यावसायिकाकडून करण्यात आली असून या प्रकारामुळे शहरातील निसर्ग आणि पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या संबंधित बांधकाम व्यावसायिकावर महापालिका फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखविणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असून विकास आराखडय़ातील आरक्षण उठविण्याचे प्रकार शहराच्या हिरवाईवर घाला घालणारे ठरत असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

नगररस्ता भागातील कल्याणीनगर येथील नदीपात्रालगत हरित पट्टय़ाचे आरक्षण प्रस्तावित होते. शहराचा विकास आराखडा करताना हरित पट्टय़ाचे आरक्षण उठविण्यात येऊन यातील काही जागा एका मोठय़ा बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी निवासी करण्यात आली. कल्याणीनगर कडून नगरवाला शाळेकडे जाताना एचएसबीसी बँकेसमोर असलेल्या या जागेत सध्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या जागेत काही महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या जाती-प्रजातींची भरपूर झाडे होती. मात्र, याच झाडांवर घाला घालण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे झाडांची कत्तल करताना महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचीही मान्यता घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य धनंजय जाधव आणि मनोज पाचपुते यांनी या प्रकारासंदर्भात वृक्ष प्राधिकरण विभागाचे सचिव दयानंद घाडगे यांच्याकडे तक्रार केली.

हरित पट्टय़ातील ५०० झाडांची कत्तल करण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर वृक्ष गणनेचे काम दिलेल्या सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी  वृक्ष प्राधिकरण समितीकडून संपर्क साधण्यात आला. सार आयटी र्सिोसेस या कंपनीने शहरातील वृक्षांची गणना केली होती. तसा अहवाल त्यांनी महापालिकेला दिला होता. त्यामुळे नक्की परिस्थिती काय आहे, याची माहिती या कंपनीकडून घेण्यात आली. कंपनीनेही या जागेवर गणनेवेळी ५९२ वृक्ष आढळून आल्याचा अहवाल प्राधिकरणाला दिला. सध्या या जागेवर २० ते २५ वृक्ष अस्तित्वात असल्याची माहिती प्राधिकरण समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली.  संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बेकायदेशीर वृक्षतोड करुन तेथील हरितपट्टा नष्ट केल्यानंतर नदीपात्रात बेकायदेशीर भिंत बांधली  आहे. त्यामुळे बांधकाम आणि बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

तक्रारीला पुष्टी

यापूर्वी येरवडा येथील डॉ. सलीम अली अभयारण्यातील २२ एकरापैकी साडेचार एकरावरील दोन भूखंड निवासी करण्याचा आणि शहराचे वैभव असलेल्या एम्प्रेस गार्डन येथील मोकळ्या जागेत बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे तीव्र पडसाद शहरातील निसर्गप्रेमींमध्ये उमटले. त्यातच हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यामुळे शहरातील हिरवाईवर घाला घालण्यात येत असल्याच्या तक्रारीला पुष्टी मिळत आहे.