संगणक अभियंता नयना पुजारी Nayana Pujari gangrape and murder case बलात्कार व खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत हा सुनावणी दरम्यान पळून गेल्या प्रकरणात त्याला न्यायालयाने सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी हा आदेश दिला. राऊत याला पळून गेल्याप्रकरणी दोन वर्षे, बनावट नाव धारण करणे एक वर्षे, बनावट कागदपत्रे तयार करणे दोन वर्षे व एक हजार दंड आणि बनावट कागदपत्रांचा वापर करणे एक वर्षे अशा विविध कलामांखाली सुनावलेली शिक्षा वेगवेगळी भोगावी लागणार असल्यामुळे त्याची शिक्षा सहा वर्षे राहणार आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कमल ३१ नुसार या सर्व शिक्षा एकापाठोपाठ एक अशा भोगाव्या लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
न्यायालयात खटला सुरू असताना कायदेशीर रखवालीतून पळून गेल्यामुळे सत्र न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होऊन न्यायालयाचा बहुमुल्य वेळ खर्च झाला. तसेच, तो फरार असल्यामुळे खटल्यातील साक्षीदार दडपणाखाली होते. तपासासाठी पोलीस पथके काम करीत होती. त्यांचाही त्याच्यामुळे वेळ वाया गेला. खटला सुरू असताना पळून जाणे, बनावट कागदपत्रे तयार करून ओळख लपविणे, असे गंभीर गुन्हे केले असल्यामुळे आरोपीला दया दाखविल्यास चुकीचा संदेश जाईल, असे मत देखील न्यायालयाने व्यक्त केले. भारतीय दंड संहिता कलम २२४, ४१९, ४६८ आणि ४७१ या कलमांखाली सुनावलेली शिक्षा वेगवेगळी भोगावी लागणार आहे. योगेश राऊतला मदत केल्याचा आरोप असलेला त्याचा भाऊ, मनोज राऊत, त्याचा मित्र सतीश पाडेकर यांची पुराव्या अभावी न्यायालयाने सुटका केली.
संगणक अभियंता नयना पुजारीचे अपहरण करून ७ ऑक्टोंबर २००९ रोजी तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा खून करून मृतदेह राजगुरूनगर जवळील जरेवाडी गावाजवळ टाकला होता. यामध्ये योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक केली होती. या आरोपींवर खटला सुरू असताना राऊत याला अंगाला खाज सुटल्यामुळे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. १७ सप्टेंबर २०११ रोजी तो रुग्णालयातून पळून गेला होता. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी करून राऊत याला शिर्डी येथून अटक केली. फरार काळात राऊत हा रविकुमार नाव धारण करून राहत होता. त्याच्याकडून बनावट पॅनकार्ड, कागदपत्रे जप्त केली होती. या खटल्यात सहायक सरकारी वकील सुचित्रा नरूटे यांनी ११ साक्षीदार तपासले.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2015 रोजी प्रकाशित
Nayana Pujari case: नयना पुजारी खून खटल्यातील पलायन करणाऱ्या योगेश राऊतला सहा वर्षे सक्तमजुरी
संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत हा सुनावणी दरम्यान पळून गेल्या प्रकरणात त्याला न्यायालयाने सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 17-05-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 year hard labour to yogesh raut