६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची स्वरांनी नांदी

पुणे : अभिजात संगीताच्या प्रांतात जगभरात नावाजला गेलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ गंधर्व सुरांचा दरबार बुधवारपासून (११ डिसेंबर) सुरू होत आहे. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या स्वरांनी महोत्सवाची नांदी होणार असून रविवापर्यंत (१६ डिसेंबर) सलग पाच दिवसांच्या स्वरसोहळ्यात सहभागी होण्यासाठी कानसेन रसिक आतुर झाले आहेत.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ७० हजार चौरस फूट जागेत उभारलेला प्रशस्त रंगीबेरंगी मांडव, आकर्षक दिवे आणि झुंबर, ऐसपैस जागा, प्रशस्त वाहनतळ अशी यंदाच्या महोत्सवाची वैशिष्टय़े आहेत. एका वेळी १२ हजारांहून अधिक रसिक सहजपणे  संगीताचा आनंद घेऊ शकतील, अशी व्यवस्था गोखले मांडववाले यांनी केली आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी महोत्सव स्थळी भेट देऊन सर्व गोष्टींची पाहणी केली. गेल्या दोन दशकांपासून महोत्सवाची ध्वनिव्यवस्था सांभाळणारे ‘स्वरांजली’चे प्रदीप माळी म्हणाले,की नवीन तंत्रज्ञानामुळे रसिकांना सुश्राव्य संगीताचा अनुभव घेता येणार आहे. डिजिटल मिक्सर, प्रोसेसर, चार लाइनर ध्वनिवर्धक, कॅनडियन अ‍ॅडमसन कंपनीचे ध्वनिवर्धक अशी अत्याधुनिक व्यवस्था केली आहे. कलाकारांचा स्वर विनाव्यत्यय रसिकांपर्यंत थेट पोहोचवण्याचे काम सिंगल सोर्स ध्वनिवर्धक करणार आहेत. पुढील बाजूस चार आणि मागील बाजूस चार असे सिंगल सोर्स ध्वनिवर्धक बसविण्यात आले असून कलाकारांचे स्वर आणि वादक कलाकारांच्या वादनातील बारकावे रसिकांना सुस्पष्टपणे ऐकू जातील. या ध्वनिव्यवस्थेसाठी आठ तंत्रज्ञ सदैव कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण मंडपामध्ये सहा एलईडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्यामुळे स्वरमंचावर होणाऱ्या प्रत्येक हालचाली आणि कलाकारांच्या भावमुद्रा रसिकांना स्पष्टपणे पाहता येणार आहेत. एलईडी स्क्रीनमुळे पाय मोकळे करण्यासाठी मंडपाबाहेर पडणाऱ्या संगीतप्रेमींनाही महोत्सवाचा आनंद लुटता येईल.

‘षड्ज’मधील लघुपट

’  व्ही. पाकिरासामी दिग्दर्शित ‘पं. रामनारायण – ए ट्रिस्ट विथ सारंगी’

एन. शास्त्री दिग्दर्शित ‘उस्ताद अमीर खाँ’

‘अंतरंग’मध्ये पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत

स्थळ- सवाई गंधर्व स्मारक, गणेशखिंड रस्ता

वेळ- सकाळी १०

महोत्सवात

आज (दुपारी ४ वाजता)

’  गिरीश संझगिरी (गायन)

’  जयंती कुमरेश (वीणावादन)

’  अर्चना कान्हेरे (गायन)

’  पं. हरिप्रसाद चौरासिया