पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय; नाटय़, सांस्कृतिक क्षेत्राला मोठा दिलासा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या चारही नाटय़गृहांमध्ये भाडेदरात ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. जोपर्यंत प्रेक्षकसंख्येवर ५० टक्के र्निबध राहील, तोपर्यंत ही सवलत मिळणार आहे. करोना संकट काळात मोठे नुकसान झालेल्या नाटय़क्षेत्राला या सवलतीमुळे दिलासा मिळाला आहे.
करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने १४ मार्चपासून नाटय़गृहे बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून नाटय़गृहांमध्ये नाटके तथा सांस्कृतिक कार्यक्रम झालेले नाहीत. सगळं ठप्प झाल्याने नाटय़क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करताना, ५ नोव्हेंबरपासून नाटय़गृहे पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानंतरही आर्थिक कारणास्तव नाटके तथा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होऊ शकले नव्हते. त्यानंतर, नाटय़निर्माता संघाने नाटगृहांच्या भाडेदरात सवलत देण्याची मागणी विविध पातळ्यांवर सुरू केली. अभिनेते प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपरीच्या महापौर माई ढोरे व पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेटही घेतली होती.
या पाश्र्वभूमीवर, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा सध्याच्या तुलनेत भाडेदरात ७५ टक्के सवलत देण्याचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत तथा प्रेक्षकसंख्या ५० टक्के ठेवण्याचा बंधन असेल, तोपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. जेमतेम २५ टक्केच भाडे भरावे लागणार असल्याने नाटय़क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.