दिवाळी अंकाच्या माध्यमातून शेतकरी महिलेसाठी ७५ हजार रुपयांचा मदतनिधी

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून अवघं आयुष्य शेती-मातीमध्ये काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी महिलेच्या संघर्षमय जिद्दीला सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून ‘सलाम’ करण्यात आला आहे. ‘अक्षरलिपी’ या पहिल्यांदाच प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाचे संपादक, लेखक आणि वाचकांकडून या शेतकरी महिलेसाठी संकलित करण्यात आलेला ७५ हजार रुपयांचा निधी रविवारी (३ डिसेंबर) सुपूर्द करण्यात येणार आहे.

औरंगाबाद-जालना रस्त्यावरील करमाडजवळचं नायगव्हाण हे लहानसं खेडं. वयाची साठी ओलांडलेल्या ममताबाई शेजूळ या गावी राहतात. डोंगरउतारावरील पडीक गायरानातील खडक स्वत:च फोडून तयार केलेली तीन एकराची हलक्या प्रतीची मुरमाड जमीन कसतात. त्यांचे पती अपंग असल्यामुळे सोबतीला इतर कोणीच नाही. मजूर घ्यायची ऐपत नाही. मग स्वत:च नांगर चालवायचा. स्वत:च पेरणी करायची. निसर्गाची कृपा होऊन चांगला पाऊस पडेल आणि शेतीत काहीतरी पिकेल या आशेवर जगत राहायचं. काही पिकलं तर ठीक नाही तर मोलमजुरी करून आला दिवस साजरा करायचा. तुटपुंज्या पशांतच घर चालवायचं आणि पतीसाठी दवाखान्याचा दैनंदिन खर्चही भागवायचा. परिस्थितीपुढे हात न टेकता आणि न थकता ममताबाई हे सारं करीत आहेत. त्यांच्या जिद्दीचा प्रवास एकीकडे काळीज पिळवटून टाकणारा असला तरी हा प्रवास स्वाभिमानाने जगण्याची नवी प्रेरणा देणाराही आहे. ‘अक्षरलिपी’ या महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले आणि प्रतीक पुरी या युवा संपादकांनी संपादित केलेल्या दिवाळी अंकाने ममताबाई यांचा हा संघर्ष आणि त्यांचं जिगरबाज जगणं वाचकांसमोर आणलं.

‘अक्षरलिपी’ या अंकाने दिवाळी अंकांच्या यादीत आपल्या वेगळेपणाने साहित्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. असंख्य जाणकार वाचकांसह रंगनाथ पठारे, रत्नाकर मतकरी, अनिल अवचट या मान्यवर साहित्यिकांकडूनही मनापासून दाद मिळाली. या दिवाळी अंकातून दत्ता कानवटे यांनी ममताबाई शेजूळ यांचा जीवनसंघर्ष वाचकांसमोर आणला. केवळ एक लेख छापून आपली जबाबदारी संपली असे न मानता ममताबाई यांच्या संघर्षमय जगण्याला बळ मिळावं म्हणून त्यांना काही मदत मिळवून देण्यासाठी ‘अक्षरलिपी’च्या चमूने पुढाकार घेतला. याची सुरुवात स्वत:पासून करत दिवाळी अंकाच्या विक्रीतून उभी राहणारी दहा टक्के रक्कम ममताबाई यांना देण्याचे ठरले. तसेच ‘अक्षरलिपी’च्या अंकातून वाचकांना ऐच्छिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. संवेदनशील वाचकांनी आणि अंकातील लेखक-कवींनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. यातून आतापर्यंत तब्बल ७५ हजार रुपयांचा मदतनिधी उभा राहिला आहे. रविवारी (३ डिसेंबर) नायगव्हाण या गावी प्रत्यक्ष जाऊन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, संपादक-कवी मनोहर सोनवणे आणि कवी श्रीधर नांदेडकर यांच्या हस्ते मदतनिधी आणि रसिकांचा जिव्हाळा ममताबाई यांच्या हाती सुपूर्द केला जाणार आहे.

‘अक्षरलिपी’ हे साहित्याबरोबरच सामाजिक जाणिवांचे कृतिशील व्यासपीठ व्हावे, अशीच आमची भूमिका आहे. यातूनच लढवय्या महिला शेतकरी ममताबाई यांच्यासाठी काही मदत उभी करणं ही आम्हाला आमची जबाबदारी वाटली. या उपक्रमात ‘अक्षरलिपी’चे हितचिंतक, वाचक, लेखक-कवी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्यामुळेच आम्ही हा मदतनिधी उभा करू शकलो. या छोटय़ाशा प्रयत्नातून ममताबाई यांच्या कष्टप्रद पण जिद्दी जगण्याला थोडंफार बळ देण्याचा प्रयत्न आम्ही केला याचे आम्हाला विशेष समाधान आहे, अशी भावना संपादक महेंद्र मुंजाळ यांनी व्यक्त केली.