चार वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या संगणक अभियंता युवकाच्या कुटुंबीयांना ८५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय महालोकअदालतीत झालेल्या तडजोडीत घेण्यात आला. सत्र न्यायाधीश एस. के. कराळे, व्ही. यू. कराळे आणि एस. आर. दातार यांच्या समितीने नुकसान भरपाईचा दावा निकाली काढून संगणक अभियंता युवकाच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.

वडगाव शेरीतील लालवाणी अपार्टमेंटमधील रहिवासी अमित नंदकुमार रानडे (वय ३६) हे एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होते. १६ एप्रिल २०१४ रोजी ते काम आटोपून रात्री घरी जात होते. दुचाकीस्वार रानडे यांचा येरवडा भागात अपघात झाला. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रानडे यांच्यामागे पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा चरितार्थचा प्रश्न निर्माण झाला होता. अपघातातील ट्रक चालक, मालक तसेच विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनी विरोधात रानडे कुटुंबीयांनी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात वकील अ‍ॅड. एस. एच. अजमानी यांच्या मार्फत नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता.

रानडे हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत मुख्य विश्लेषक होते. त्यांना दरमहा ७३ हजार वेतन मिळत होते. त्यामुळे १ कोटी ७५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती रानडे कुटुंबीयांकडून करण्यात आली होती.

तडजोडीत रानडे कुटुंबीयांना ८५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडून अ‍ॅड. ॠषीकेश गानू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी विक्रम जांभाळ, वर्षां पावगी यांनी साहाय्य केले.