पुणे शहरातील मध्य भागात बुधवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये टिळक रोड परिसरात ग्राहक पेठेसमोरून जात असलेल्या एका पीएमपीबसवर मोठे वडाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत बसचालकाचा गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय नवघणे असे मृत चालकांचे नाव आहे. अद्यापही नवघणे यांचा मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेले नाही. गुरुवार पेठ येथील शितळादेवी चौक परिसरातही एक मोठे झाड कोसळले आहे. हे झाड हटवण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर काम करीत आहेत.

संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच आकाशात काळेकुट्ट ढग निर्माण झाले होते. त्यामुळे अंधार पडण्याआधीच सर्वत्र अंधाराची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ७ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बाजीराव रोडवरील सरस्वती विद्या मंदीर या शाळेच्या मैदानावर होणारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा देखील रद्द करावी लागली.

दरम्यान, शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाली आहे.