पुण्यात मोबाइल गेमच्या नादात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष माळी असं या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपुर्वी संतोषने चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये लिहिलेल्या मजकुरावरुन त्याने मोबाइल गेमच्या नादात आत्महत्या केल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

संतोष हा वाघोली येथील महाविद्यालयात वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. आई-वडील आणि आजीसोबत तो राहत होता. त्याला मोबाइल गेमचं प्रचंड व्यसन होतं. कुटुंबीयांनी वारंवार सांगूनही त्याने मोबाइल गेम खेळणं सोडलं नव्हतं. गुरुवारी घरी एकटा असताना मोबाइलवर गेम खेळून झाल्यानंतर त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं.

दरम्यान संतोषने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने ‘अवर सन विल शाईन अगेन’, ‘पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर मुक्त झाला’ आणि ‘द एंड’ असं लिहिलं आहे. सोशल मीडियावरील अकाऊंटवरही संतोषने मोबाइल गेममधील पात्र ‘ब्लॅक पँथर’चा फोटो ठेवला होता.

लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येची नोंद केली आहे. संतोषचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. पोलीस मोबाइलच्या आधारे आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावलं लागलं अशा कोणत्या मोबाइल गेमचं संतोषला व्यसन होतं याचाही शोध घेतला जात आहे.