पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘कारभारी’ उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या बगलबच्च्यांनी दिवसाढवळ्या पालिकेच्या तिजोरीची लूट केली असून बेकायदेशीरपणे  काम करून कोटय़वधींच्या मालमत्तेची उधळपट्टी केली आहे, असा आरोप मावळ लोकसभेचे ‘आप’चे उमेदवार मारुती भापकर यांनी चिंचवडला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला.
भापकर म्हणाले, पिंपरी पालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे टाकून पोती भरून पैसे बारामतीला नेले जातात. दुष्काळी जनतेला उद्देशून अजितदादांनी केलेले ते  विधान मुजोरपणाचे होते, तो मुजोरपणा ठेचून काढण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे तरुणांची माथी भडकावतात आणि आंदोलनाशी संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहून देतात. लक्ष्मण जगताप उमेदवार असलेल्या शेकापचे बाजारीकरण झाले आहे. मनसेने कोटय़वधी रुपये घेऊन त्यांना पुरस्कृत केले. गजानन बाबर यांची उमेदवारी शिवसेनेने कापली, १२ कोटी देऊन तिकीट विकले गेल्याचा आरोप बाबर यांनी केला आहे. राहुल नार्वेकर स्वत:ला सुशिक्षित म्हणवितात. मात्र, माण, रायगड आणि मावळच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता, तेव्हा ते कुठे होते. नागरिक अडचणीत असतात, तेव्हा जगताप, बारणे आणि नार्वेकरांसारखे नेते वातानकूलित खोल्यांमध्ये झोपलेले असतात, अशी टीका त्यांनी केली.