राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवराज दाखले नामक व्यक्तीला पुण्यातील वाकड पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या होत्या. आता त्याच्यावर थेट तडीपारीची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन त्याच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते’, असा वादग्रस्त आरोप युवराज दाखलेनं केला होता. यावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यावरून अजित पवारांनी विधानसभेतच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं.

काही तासांत ठोकल्या होत्या बेड्या

युवराज दाखले याच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, शिक्रापूर, चाकण, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. विधानसभेत अजित पवार यांनी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये युवराज दाखलेला पिंपरी-चिंचवडमधून वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

नेमकं काय घडलं विधानसभेत? – “जर सरकारमध्ये खरंच नैतिकता असेल, तर…”, देवेंद्र फडणवीस विधानसभेत आक्रमक

युवराज दाखले यानं हा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केला होता. याविरोधात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सदस्य कोमल शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. युवराज दाखलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल देखील झाला होता.