डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी पुणे पोलीसांनी गोव्यातून ताब्यात घेतलेल्या दोघांचा संबंध नसल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सोमवारी सांगितले. दाभोलकर हत्येप्रकरणी मनीष नागोरी याच्याकडेच पोलीस चौकशी करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विद्यापीठातील रखवालदाराच्या खुनातील आरोपी मनीष नागोरी याने दिलेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी सुपारी घेऊन खून करणाऱ्या दोघांना गोव्यातून ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा दाभोलकरांच्या हत्येशी संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षक प्रल्हाद जोगदंडकर आणि डॉ. दाभोलकर यांच्या खूनामध्ये मारेकऱ्यांनी एकाच प्रकारचे पिस्तुल वापरले आहे. विद्यापीठ खून प्रकरणी पोलिसांनी नागोरीसह चौघांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. नागोरीने ४७ जणांस शस्त्रास्त्र पुरविल्याचे समोर आले आहे. त्यानेच डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शस्त्र पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोव्यातून दोघांना ताब्यात घेतले होते.