४ हजार ७०६ वाहनचालकांवर कारवाई; २२ लाखांचा दंड

पुणे : शहरात गेल्या मंगळवारपासून टाळेबंदी लागू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक कमी झाली. वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) जरी सुरू असले तरी रस्त्यावर गर्दी नसल्याचे पाहून अनेकांनी वाहतुकीचे नियम धुडकावले. मात्र, टाळेबंदीतही शहरातील चौकाचौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बेशिस्तांवर नजर होती. आठवडाभरात नियमभंग करणाऱ्या ४ हजार ७०६ वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात आली आहे.

टाळेबंदी लागू झाल्यानंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. प्रमुख चौकात नाकाबंदी करण्यात आली. रस्त्यावर गर्दी कमी असल्याने सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बंद असावेत, असा समज वाहनचालकांमध्ये झाला त्यामुळे पादचारी मार्गावर वाहने थांबविणे तसेच वाहन चालवितांना मोबाइलवर संभाषण असे प्रकार घडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना टिपले आणि लगेचच त्यांना वाहतूक पोलिसांकडून नियमभंग केल्याबाबतचा संदेश पाठविण्यात आला. आठवडाभरात  शहराच्या वेगवेगळ्या भागांत नियमभंग करणाऱ्या ४ हजार ७०६ वाहन  चालकांवर कारवाई करुन  २२ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत वाहतूक शाखेतील नियोजन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले,‘टाळेबंदी लागू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांवर कारवाई केली. अनेकांनी थकीत दंडाची रक्कम भरलेली नव्हती. नाकाबंदीत पोलिसांनी वाहनचालकांची तपासणी केली. ज्यांच्याकडून थकीत दंडाची रक्कम जमा झाली नव्हती, त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. शहरातील विविध रस्त्यावर वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के एवढीच आहे. टाळेबंदीतही पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होते. नियम धुडकावणाऱ्यांना कॅमेऱ्यांनी अचूक टिपले.

टाळेबंदीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कारवाई

(कालावधी १३ ते २१ जुलै )

* नियमभंग करणारे वाहनचालक- ४ हजार ७०६

* एकूण दंडाची रक्कम- २२ लाख १८ हजार ५०० रुपये

* जमा झालेला दंड- ६१ हजार ५०० रुपये

* थकीत दंडाची रक्कम- २१ लाख ५७ हजार रुपये