राहुल खळदकर

महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांवर इ-चलन यंत्राद्वारे कारवाई करण्यास सुरुवात झाली असून महामार्ग पोलिसांच्या वाहतूक पथकांना इ-चलन यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यापूर्वी महामार्गावर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंडाची पावती देण्यात येत होती. इ-चलन यंत्राद्वारे कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने आता बेशिस्त वाहनचालक आणि महामार्ग पोलिसांना ‘तडजोड’ करण्याची संधी मिळणार नाही.

‘एक राज्य एक इ-चलन’ या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत महामार्गावर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर डिजिटल चलनाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात इ-चलन यंत्रांचे वाटप करण्यात आले असून महामार्ग पोलिसांच्या पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या २४ महामार्ग पोलीस केंद्रापैकी ८ केंद्रांवर ५३ इ-चलन यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या यंत्रणेद्वारे दंड वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव येथील टोलनाक्यावर इ-चलन यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील खंडाळा, सारोळा, भुईंज, वडगाव, कराड तसेच उजळईवाडी, बारामती फाटा, इंदापूर येथील पोलीस मदत केंद्रावर इ-चलन यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

इ-चलन यंत्राचे फायदे

महामार्ग पोलिसांना दंडात्मक कारवाईसाठी पावती पुस्तकांचा वापर करण्याची आवश्यकता नाही. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाने यापूर्वी केलेले नियमभंग, दाखल खटले याबाबतची माहिती यंत्राद्वारे मिळणार आहे. त्यामुळे थकित दंडाची रक्कम वसूल करणे शक्य होईल. जप्त तसेच निलंबित केलेल्या वाहन परवान्याची माहिती उपलब्ध होईल तसेच वाहन चालकाने उतरविलेल्या विम्याची माहिती या यंत्रणेद्वारे उपलब्ध होईल.

अपघातस्थळाचे छायाचित्र यंत्राद्वारे पाठविणे शक्य

एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याचे छायाचित्र तातडीने महामार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पाठविणे शक्य होईल  तसेच ज्या भागात इ-चलन यंत्रणेद्वारे कारवाई सुरू आहे. त्या परिसरातील कारवाईची माहिती ऑनलाइन पद्धतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित उपलब्ध होईल. इ-चलन यंत्रणेत बिघाड  झाल्यास (नेटवर्क नसल्यास) दंडात्मक कारवाई करण्यात अडथळे येणार नाहीत. ऑफलाइन पद्धतीने बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई करणे शक्य होईल.