गॅसधारक असल्याची  शिधापत्रिकेवर नोंद आता बंधनकारक

घरगुती गॅस सिलिंडर असताना शिधापत्रिकेवर (रेशनकार्ड) गॅसधारक म्हणून नोंद न करणाऱ्या नागरिकांवर आता कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. अशा शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन त्यांचा सिलिंडर पुरवठा थांबविण्याचा निर्णय शहर पुरवठा कार्यालयाने घेतला आहे. अनुदानित गॅस सिलिंडर असूनही शिधापत्रिकेवरील रॉकेलचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना यामुळे चाप बसणार आहे.

शहरातील काही भाग रॉकेलमुक्त करण्याची योजना पुरवठा खात्याने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या माहितीचे संकलन करण्यात येत आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांनी गॅस सिलिंडर असल्याची नोंद केली नसल्याचे आढळून आले आहे. तसेच घरगुती सिलिंडरचा लाभ घेताना ही कुटुंबे शिधापत्रिकेवरील रॉकेलही घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा गैरप्रकार शोधून काढण्यासाठी शिधापत्रिकेवर गॅसधारक अशी नोंद करण्याची मोहीम शहर पुरवठा कार्यालयाने हाती घेतली आहे. घरपोच सिलिंडर देणाऱ्या गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून शिधापत्रिकेवर गॅसधारक अशी नोंद करण्यात येत आहे. शहरामध्ये पुढील तीन महिने ही मोहीम राबविणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी दिली.

शहरातील गॅस एजन्सी चालकांच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत गॅसधारकांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये गॅस कंपन्या आणि राज्य सरकारकडे असलेली गॅस सिलिंडरधारकांची नोंद यामध्ये मोठी तफावत आढळून आली. घरगुती सिलिंडर असणाऱ्या व्यक्तींची नेमकी संख्या स्पष्ट व्हावी आणि सिलिंडर असूनही रॉकेल घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची माहिती मिळावी यासाठी तातडीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शिधापत्रिकेवर गॅसधारक असल्याची नोंद एक महिन्यात करून घेण्याच्या सूचना सर्व गॅस एजन्सीधारकांना देण्यात आल्या आहेत. शहरात १३० गॅस एजन्सीधारक आहेत. या महिन्यात सिलिंडरधारकाने शिधापत्रिका दिली नाही तर पुढील महिन्यात त्याची नोंद करून घ्यावी. या दोन महिन्यांत गॅसधारक अशी नोंद न करून घेतल्यास संबंधितांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही अशी नोंद करून घेतली गेली नाही, तर मात्र संबंधितांचा सिलिंडर पुरवठा थांबविण्यात येणार असल्याचे धायगुडे यांनी सांगितले.