फर्ग्युसन  रस्त्यावरील विविध प्रकारच्या अतिक्रमणांवर महापालिकेकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. फर्ग्युसन  रस्त्यावरील गरवारे पूल ते शेतकी महाविद्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील पदपथ, चौकातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली असून क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार बुधवारी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फर्ग्युसन  रस्त्यावर कारवाई करून जवळपास शंभराहून अधिक अतिक्रमण हटविण्यात आली. महापालिकेचा बांधकाम विभाग, आकाशचिन्ह विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून संयुक्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

या कारवाईमध्ये अनधिकृत शेड आणि बांधकाम हटवून सुमारे सहा हजार ९६६ चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. याशिवाय ८२ बोर्ड, बॅनर आणि फ्लेक्स, खासगी जागेतील बारा स्टॉल, रस्त्यावरील तीन स्टॉल, तीन हातगाडय़ा, सहा पथारी आणि नऊ शेड्सवर ही कारवाई करण्यात आली. तसेच दोन सिलिंडरही जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली. शहर फेरीवाला धोरणानुसार शहरातील काही प्रमुख रस्ते आणि चौक अतिक्रमण मुक्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मात्र सातत्याने अतिक्रमण कारवाई केल्यानंतरही काही दिवसांत पुन्हा हे रस्ते आणि चौक अतिक्रमणांच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे यापुढील काळात तीव्र कारवाई करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.