वाहन क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी शेकडो वाहने रोज रस्त्यावर धावत असताना िपपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन महिन्यांत अवघ्या १५७ वाहनांवर कारवाई केली आहे. परिवहन कार्यालयाकडून अशा वाहनांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारे वाहनचालक नियमांकडे सर्रास डोळेझाक करत आहेत.

मालवाहकतूक करणाऱ्या वाहनांची भारवाहक क्षमता जेवढी आहे, तेवढीच मालवाहतूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. या नियमांकडे डोळेझाक करून मालवाहतूक वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन रस्त्यावर येतात.

िपपरी परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत जुन्नर, खेड, आंबेगाव, लोणावळा आदी भागांचा समावेश होतो. या भागात वाढलेले नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. बांधकाम साहित्य तसेच औद्योगिक कंपन्यांसाठी मालवाहतूक करणारी वाहनांची संख्या वाढली असून ही वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेत असतात. अशा वाहनांवर होत असलेल्या कारवाईमध्ये सातत्य राखण्यात आलेले नाही.

३२ लाख ९० हजार रुपयांचा वाहनचालकांकडून दंड वसूल

िपपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ एप्रिलपासून जून अखेपर्यंत फक्त १५७ वाहनांवर कारवाई केली. कारवाईपोटी परिवहन कार्यालयाने वाहनचालकांकडून ३२ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्यातील १० वाहनचालक दंड भरण्यासाठी परिवहन कार्यालयाकडे आलेच नाहीत. तर १ एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये दोन हजार १५ वाहनांवर कारवाई करून तीन कोटी ९१ लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. दोन हजार १५ वाहनांमधील ११९ वाहनांनी अद्यापपर्यंत परिवहन कार्यालयाकडे दंड भरलेला नाही.