मळवली येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी मागे घेण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता, कार्ला विभागाचे मंडलाधिकारी आणि इतर तिघांना एक लाख रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळी रंगेहाथ पकडले.
कार्ला मावळ येथील मंडलाधिकारी विकास पांडुरंग पाटील (वय ३७),माहितीअधिकार कार्यकत्रे संदीप राजाराम तिकोणे ( वय ३२, रा. पाटण, मावळ),  शिवडी मुंबईचे माजी नगरसेवक गणेश भीमाजी तिकोणे (वय ५८, रा. शिवडी, मुंबई) आणि अनिल बबन तावरे (वय ४६, रा. पश्चिम ठाणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रामुगडे सहजीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेश रामुगडे ( रा. मळवली, मावळ) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मळवली येथे रामगुडे यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे. त्यांचे बांधकाम नदीपात्र बुजवून केलेले असल्याने यातील आरोपी गणेश तिकोणे याने राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. तर संदीप तिकोणेने सोसायटीची सीमािभत ही नाला बुजवून अतिक्रमण केल्याची तक्रार मावळच्या तहसीलदारांकडे केली होती. या दोन्ही तक्रारी मागे घेण्यासाठी गणेश तिकोणे याने दोन कोटी व संदीप तिकोणे याने २५ लाख रूपयांची मागणी डॉ. रामुगडे यांच्याकडे केली होती. याप्रकरणी कार्लाचे मंडलाधिकारी विकास पाटील यानी मध्यस्थी करण्यासाठी २५ हजारांची मागणी केली होती. यासंदर्भात तडजोड करण्यासाठी डॉ. रामुगडे यांनी लोणावळ्यातील सेंटर पॉंईट हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजता बोलावले होते. या वेळी तडजोड करत गणेश तिकोणे याने एक कोटी पंधरा लाख व संदीप तिकोणे याने १८ लाख आणि मंडलाधिकारी २५ हजार रूपयांवर तडजोड करण्यात आली. या व्यवहाराचे टोकन म्हणून गणेश तिकोणे याला पन्नास हजार, संदीप तिकोणे याला २५ हजार आणि मंडलाधिकारी पाटील याला पंचवीस हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक दिलीप कदम, उपअधीक्षक हेमंत भट, रेखा साळुंखे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.