शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही, असे म्हणणारे खासदार शिवाजीराव आढळराव प्रत्यक्षात आपल्याला घाबरतात, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार देवदत्त निकम यांनी रूपीनगर-तळवडे येथे केली. आढळराव हे फक्त सातबाऱ्यावरचे शेतकरी असून आपण हाडाचे शेतकरी आहोत. भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्षपद आढळरावांकडे होते, तेव्हा त्यांनी कारखान्याला १७ कोटींचा तोटा केला होता, नंतर आम्ही तो भरून काढला, याकडे निकमांनी लक्ष वेधले.
देवदत्त निकम यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी शनिवारी संपर्क साधला. आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेते मंगला कदम, प्रकाश म्हस्के, नगरसेवक तानाजी खाडे, अजित गव्हाणे, शुभांगी बोऱ्हाडे, शशीकिरण गवळी आदी उपस्थित होते, तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
निकम म्हणाले,की राजकारणात मी नवखा नाही, मात्र तसा अपप्रचार सुरू आहे. १९९१ पासून २३ वर्षांत सरपंचपासून ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद असा प्रदीर्घ प्रवास व अनुभव आपल्याकडे आहे. आढळराव कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांनी १७ कोटीचे नुकसान केले होते. नंतरच्या तीन वर्षांत आम्ही ते भरून काढले. तुल्यबळ उमेदवार नाही, असे आढळराव म्हणतात, मात्र प्रत्यक्षात घाबरतात. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पुन्हा-पुन्हा वेळ मागतात, ते नाही म्हटल्यानंतर आदित्य ठाकरे यांना घेऊन फिरतात, नरेंद्र मोदी यांच्यासमवेत फोटो काढून प्रचारात वापरतात. या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली असून धनशक्ती विरूध्द जनशक्तीचा विजय होणार आहे. आढळरावांच्या कार्यपध्दतीला कंटाळून अनेक चांगले मोहरे त्यांचा पक्ष सोडून गेले आहेत. मी अजातशत्रू असल्याने माझा कोणी शत्रू नाही. त्याचा फायदा मला होणार आहे. शेतकऱ्यांचे तीन प्रकार आपल्याला माहिती आहेत. नुसताच सातबारा असलेला शेतकरी, बांधावरचा शेतकरी आणि हाडाचा शेतकरी. नुसतीच शेतजमीन नावावर असली म्हणून कोणी शेतकरी होत नाही. आढळराव सातबाऱ्यावरचे शेतकरी असून आपण हाडाचे शेतकरी आहोत, अशी टिप्पणी निकम यांनी केली.