News Flash

‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के  राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के  राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २० दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठीची सोडत ७ एप्रिलला काढण्यात आली होती. त्यात ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर करोना प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करावी लागली. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.

प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश घ्यावा. बरेच पालक प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश अर्जात घर ते शाळेचे अंतर चुकीचे भरतात. त्यामुळे पालकांनी सादर के लेल्या रहिवासी पत्त्याच्या पुराव्यावरून शाळेने अंतराची पडताळणी करावी. चुकीचे अंतर नमूद केल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. संबंधित पालकांना तालुकास्तरीय समिती, शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे. पडताळणी समितीने आलेले अर्ज, तक्रारींची शहानिशा करून प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश सुरू होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा.

शाळांनी पालकांना प्रवेशासाठी तारखा द्याव्यात आणि आरटीई प्रवेश सुरू झाल्याची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. त्याबाबतच्या सूचना आरटीई संकेतस्थळावर दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांसाठी..

करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशासाठी प्रत्यक्ष शाळेत येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअॅप द्वारे शाळेशी संपर्क  साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:31 am

Web Title: admission process under rte june 11 ssh 93
Next Stories
1 पुस्तकांच्या दुकानांमध्ये पुन्हा लगबग
2 कर्त्यां महिलांचे हकनाक बळी; कुटुंबीय सुन्न
3 पिरंगुट अग्नितांडव : कंपनीचा मालक निकुंज शहाला अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!
Just Now!
X