केंद्रीय प्रवेश फेरीतून हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही की, पालक आणि विद्यार्थ्यांची पावले व्यवस्थापन कोटय़ाकडे वळत असत. मात्र, आता नियमित प्रवेश प्रक्रियेची वाट न पाहता व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश घेण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेपूर्वी व्यवस्थापन कोटय़ाचे प्रवेश करण्याची सूचना माध्यमिक संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे प्रवेश करून देणाऱ्या एजंटचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अकरावी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेबाबत सिस्कॉम आणि श्यामची आई फाऊंडेशन यांनी एक अहवाल तयार करून तो शासनाला दिला होता. त्यानुसार आता अकरावीची व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा यासाठीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन करण्यात येणार आहे. नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोटय़ातील जागांचे प्रवेश करावेत असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कोटय़ातील प्रवेश करण्याचे अधिकार हे संस्थांकडेच राहणार आहेत. मात्र, प्रवेश ऑनलाईन पद्धतीने आणि नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी करावे लागणार आहेत. या सूचनेवर संस्थाचालकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्येही राखीव असलेल्या पन्नास टक्के कोटय़ातील प्रवेश ऑनलाईन करण्याची सूचनाही या अहवालात करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत कायदेशीर बाबी पडताळूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘नियमित प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर ज्यांना मनासारखे महाविद्यालय मिळत नाही, ते विद्यार्थी आणि पालक व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश घेण्यासाठी येतात. प्रवेश प्रक्रिया झाल्याशिवाय नेमकी परिस्थिती काय आहे, कोणत्या महाविद्यालयाची यादी किती गुणांवर बंद झाली आहे, याची कल्पना येत नाही. मात्र, आधीच व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश होणार असतील, तर प्रवेश मिळेल की नाही, या भीतीपोटी प्रवेश निश्चित करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल राहील. त्यामुळे संघटना, प्रवेश मिळवून देणारे एजंट्स यांच्याकडून विद्यार्थ्यांची अधिकच फसवणूक होण्याची शक्यता आहे,’ असे मत संस्थाचालकांनी व्यक्त केले.