उरुळी आणि फुरसुंगी कचरा डेपोच्या विरोधात शिवसेनेने शुक्रवारपासून सुरू केलेल्या गाडय़ा अडवा आंदोलनामुळे शहरातील कचरा जागेवरच साठण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार विजय शिवतारे यांच्याबरोबर या प्रश्नातून तोडगा काढण्यासाठी महापालिकेत बैठक झाली. मात्र, बैठकीतून ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आंदोलन कायम असून शनिवारी (९ ऑगस्ट) या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे.
महापालिकेने उरुळी येथील कचरा डेपो बंद करावा, या मागणीसाठी आमदार शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलक सकाळपासूनच मोठय़ा संख्येने जमले होते. या आंदोलनामुळे सर्व कचरा जागेवरच साठायला सुरुवात झाली आहे. कचरापेटय़ा भरल्यामुळे अनेक ठिकाणच्या कचरापेटय़ांमधील कचरा रस्त्यावरही पसरत आहे.
या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी महापौर चंचला कोद्रे यांनी महापालिकेत बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच उपमहापौर बंडू गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, सभागृहनेता सुभाष जगताप, विरोधी पक्षनेता वसंत मोरे, गटनेता वसंत मोरे, गणेश बीडकर, अशोक हरणावळ, डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती या वेळी होती. महापालिकेने सातत्याने आश्वासने दिलेली असली, तरी ती पाळलेली नाहीत. त्यामुळे आंदोलन सुरू केल्याचे शिवतारे यांनी या वेळी सांगितले. हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पदाधिकारी, आंदोलक व प्रशासन यांच्यात चर्चा होऊनही बैठकीत तोडगा निघू शकला नाही.
तोडगा निघू न शकल्यामुळे शनिवारी (९ ऑगस्ट) या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या प्रश्नातून तोडगा काढावा, यासाठी त्यांना विनंती केली जाणार आहे.