सिंहगड संस्थेतून ड्रेनेजचे तसेच सांडपाणी गावाच्या ओढय़ात सोडून दिले जात असून त्या पाण्याने ओढय़ाचे पाणी दूषित झाले आहे. ----
सिंहगड संस्थेतून ड्रेनेजचे तसेच सांडपाणी गावाच्या ओढय़ात सोडून दिले जात असून त्या पाण्याने ओढय़ाचे पाणी दूषित झाले आहे.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीकडून लोणावळ्याजवळील कुसगाव येथील डोंगरावर शासनाची कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेली डोंगरफोड, पिण्याच्या पाण्याचा प्रमाणापेक्षा अधिक होत असलेला वापर आणि संस्थेतील सांडपाणी व ड्रेनेज खुलेआम गावाच्या ओढय़ात सोडण्याचा प्रकार यांच्या विरोधात कुसगाव व डोंगरगाव ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी संस्थेच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रामस्थांनी निदर्शनेही केली.
कुसगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सुरज केदारी, ज्ञानेश्वर गुंड, गबळू ठोंबरे, संगीता गाडे, सुमित्रा लोहर, संगीता झगडे, डोंगरगावच्या सरपंच नयना कोळूसकर, माजी उपसरपंच सुनील येवले, शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कुसगाव ग्रामपंचायत ते सिंहगड संस्था असा पायी मोर्चा काढून संस्थेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सिंहगड संस्थेच्या व्यवस्थापनाकडून सुरू असलेला मनमानी कारभार संस्थेने तातडीने थांबवावा तसेच डोंगरावर सुरू असलेले उत्खनन बंद करावे, गावाच्या ओढय़ात ड्रेनेज व सांडपाणी सोडण्याचा प्रकार थांबवावा आणि पिण्याच्या पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करून कुसगाव डोंगरगाव ग्रामस्थांनाही पाणी मिळावे यासाठी सहकार्य करावे, अशा मागण्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचा व्यवस्थापनाने सकारात्मक विचार न केल्यास संस्थेच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुरज केदारी यांनी दिला आहे. मागण्यांचे निवेदन संस्थेतर्फे प्राचार्य गायकवाड यांनी स्वीकारले आणि ग्रामस्थांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले.
लोणावळा ग्रामीण, लोणावळ शहर व कामशेत पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. मात्र ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

तहसीलदारांच्या नोटिशीकडे दुर्लक्ष
शासनाची कोणतीही परवानगी न घेता सिंहगड संस्थेने केलेल्या अनधिकृत उत्खननाचा पंचनामा करत संस्थेला दोन कोटी ८३ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र या नोटिशीला केराची टोपली दाखवत संस्थेच्या व्यवस्थापनाने उत्खननाचे काम सुरू ठेवले आहे. या प्रकाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सुरज केदारी, गबळू ठोंबरे व ज्ञानेश्वर गुंड यांनी केली आहे.