खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांची सूचना

कचरा प्रश्नावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुढे आल्यानंतर पक्षाचे नेते अजित पवार यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. एकमेकांविरोधात बोलताना काळजी घ्या, असे सांगतानाच पाच वर्षांत काय केले हे लोक लक्षात ठेवत नाही तर शेवटच्या चार महिन्यात काय झाले याकडे पाहिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील कचरा प्रश्नासंदर्भात बैठक घेताना लोकप्रतिनिधी म्हणून या शहरात फिरण्याची मला लाज वाटते, असे विधान राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा आणि खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केले होते. त्याचे तीव्र पडसाद राष्ट्रवादीसह अन्य पक्षात उमटले होते. राष्ट्रवादीचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी चव्हाण यांच्यावर मुख्य सभेत जाहीर टीका केली होती. त्यातूनही या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. या पाश्र्वभूमीवर घेतलेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी ही सूचना केली.

वाद टाळण्यासाठी दादाची मध्यस्थी

पक्षातील वाद विकोपाला गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकारात काही दिवसांपूर्वी लक्ष घातले होते. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोणत्याही प्रकारची जाहीर विधाने करताना संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या संदर्भात त्यांनी संबंधितांशी सविस्तर चर्चा केल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतरही हा वाद कायम राहिल्यामुळे अजित पवार यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी त्याबाबत अप्रत्यक्षरित्या जाहीर विधाने न करण्यास सांगितले असले तरी त्यासंदर्भात कोणालाही वैयक्तिक सूचना देण्यात आलेल्या नाहीत.