अजित पवार  यांची टीका

दोन वर्षांत राज्य सरकारने केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे काम केले. फक्त घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात, कृती करण्यात मात्र सरकार अपयशी ठरले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली.

पवार म्हणाले, राज्य सरकारला ३१ ऑक्टोबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. जनतेला जी स्वप्नं त्यांनी दाखवली, ती फोल ठरली आहेत. सरकार असंवेदनशील आहे, हे वेगवेगळय़ा घटना व उदाहरणांवरून दिसून आले आहे. दोन वर्षांत राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असतानाही अपेक्षित कारवाई होत नाही. महागाई कमी करू म्हणाले होते. प्रत्यक्षात महागाई वाढली. राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. शिक्षक समाधानी नाहीत. न्याय्य मागण्यांसाठी सरकारकडे गेल्यानंतर त्यांना लाठय़ा खाव्या लागल्या, शिक्षकांवर खटले दाखल करण्यात आले. शेतकरी समाधानी नाही. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’च्या कितीही गप्पा मारल्या, तशा प्रकारे गुंतवणूक मात्र झाली नाही. दोन वर्षांत सर्वच आघाडय़ांवर राज्य सरकार अपयशी ठरले.