अजित पवार यांची ग्वाही; मुळशी धरणातून पाणी घेण्याचीही सूचना

पुणे : भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यामुळे खडकवासला साखळी प्रकल्पातील २. ६४ टीएमसी पाणी सिंचनासाठी द्यावे का, याबाबत विचार सुरू आहे. या संदर्भात पुणे आणि जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येईल. शहरासह ग्रामीण भागाला पाणी कमी पडणार नाही, याबाबत नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले. जलस्रोत वाढविण्याच्या दृष्टीने मुळशी येथील टाटा धरणातून पाणी घेता येईल का, याचा विचारही महापालिके ने करावा, अशी सूचना त्यांनी के ली.

महापालिके च्या महत्त्वाकांक्षी भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारी महापालिके च्या सभागृहात झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेता गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सर्व गटनेते, महापालिका आयुक्त विक्रम कु मार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. भामा-आसखेड धरणातून २.६४ टीएमसी पाणी घेण्यात येणार असल्यामुळे साखळी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यात तेवढीच कपात करावी, असा विचार आहे. नागरिकांनी पाणीबचत के ल्यास शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबतचा विचार करता येईल. टाटा वीजनिर्मिती प्रकल्प असलेल्या मुळशी धरणातून ५ ते ७ टीएमसी पाणी पुण्यासाठी घेतले तर पाणी प्रश्न सुटेल. पाण्याचा वापर करताना पाण्यावर प्रक्रिया करणेही आवश्यक राहणार आहे. त्या दृष्टीने प्रकल्प उभारावे लागतील.

फडणवीस म्हणाले, की सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीला पाणी कसे देता येईल, याकडे लक्ष देण्याची गरच आहे. जायका सारखा प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या शहरात समान पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. मात्र सांडपाण्यावर प्रक्रिया करणेच भविष्यात आवश्यक ठरणार आहे. शहराच्या विकासासाठी राजकीय मतभेद दूर ठेवून सर्वानी एकत्र येणे आवश्यक आहे. राज्याची तिजोरी अजित पवारांकडे आहे. त्यामुळे त्यांनी शहराला मोठा निधी द्यावा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक के ले.