चंद्रकांत पाटील यांची बचावात्मक भूमिका

पुणे : कार्यक्रमांना गर्दी होत असेल, तर नेत्यांचा काही दोष नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला झालेल्या गर्दीसाठी अजित पवार दोषी नाहीत, अशी बचावात्मक भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी घेतली.

कार्यक्रमाच्या संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे आणि लोकांनीही तारतम्य बाळगले पाहिजे. अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या अनुयायांनी अडचणीत आणू नये, अशा शब्दांत पाटील यांनी अजित पवार यांचा बचाव करत गर्दीचे खापर कार्यकर्ते आणि नागरिकांवर फोडले. प्रत्येक वेळी टीका करायला पाहिजे असे नाही. संयोजकांनी कार्यक्रम ऑनलाइन दाखवले तर गर्दी होणार नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

करोना काळात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका होत आहे. करोना संसर्ग वाढला तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार असेल, अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर यांनी टीका केली असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी अजित पवार यांच्याबद्दल सावध भूमिका घेतल्याने आता भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे.

अजूनही हिंदुत्ववादी असल्याचा आनंद

राजकीय परिणामांची पर्वा न करता उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही हिंदुत्ववादी आहोत असे म्हणावेसे वाटते याचे मला आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पण, अठरा महिन्यांत हिंदुत्वापासून कसे बाजूला गेलात, महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.