News Flash

‘स्मार्ट सिटी’च्या समावेशासाठी मोदींना भेटू – अजित पवार

स्मार्ट सिटीसंदर्भात पिंपरीतील तीनही खासदार व आमदार अपयशी ठरले आहेत.

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानातून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आल्यानंतर प्रथमच शहरात आलेल्या ‘कारभारी’ अजित पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ व त्यांच्याकडे दाद मागू, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील तीनही आमदार व खासदार याकामी अपयशी ठरले. स्वत:ला तोंड दाखवायला जागा राहिली नसल्याने ते आमच्यावर थातूरमातूर आरोप करत सुटले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पिंपरी पालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच उद्घाटनासाठी पवार दिवसभर शहरात होते, तेव्हा ते बोलत होते. ‘स्मार्ट सिटी’साठी आम्ही अजूनही उमेद सोडलेली नसून आशावादी आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कालच चर्चा केली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी वेळ दिली असून त्यांच्याशी चर्चा होईल. शरद पवार यांच्या माध्यमातून शिष्टमंडळासमवेत पंतप्रधानांनाही भेटू. केंद्राचा व राज्याचा निधी शहरविकासासाठी आवश्यकच आहे. ‘बेस्ट सिटी’ म्हणून गौरवलेल्या शहराला राज्यातील १० शहरांमधून कसे डावलले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देऊनही नाव वगळण्यात आले. पुणे आणि पिंपरीचा एकत्रित प्रस्ताव दिल्यामुळेच ही वेळ आली. गुणवत्तेच्या आधारावर पिंपरीसाठी प्रयत्न करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. स्मार्ट सिटीसंदर्भात पिंपरीतील तीनही खासदार व आमदार अपयशी ठरले आहेत. पिंपरी पालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे ही वेळ आली असे भाजपचे म्हणणे असल्यास तुमचे सरकार आहे, खुशाल चौकशी करावी, असे आव्हान अजितदादांनी दिले.

पिंपरीतही पाणीकपातीचे संकेत’
पाण्याची काटकसर करण्याची गरज आहे. राज्यातील काही भागात महिन्याला पाणी मिळते. पुण्यात पाणीकपात करण्यात आली असून पिंपरीतही करावी लागेल. सर्वपक्षीय गटनेत्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना अजित पवार यांनी यावेळी केली. पिंपरीतील नियोजित साहित्य संमेलनासाठी पालिकेने सहकार्य करावे, आवश्यक ती जबाबदारी स्वीकारावी, अशी सूचनाही त्यांनी केली. दिवंगत नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अजितदादांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 3:15 am

Web Title: ajit pawar slams over smart city decesion for pimpri
Next Stories
1 मंत्रीच म्हणतात.. अधिकारी खोटे बोलतात!
2 ‘ग्रीन कॉलेज, क्लिन कॉलेज’ योजनेला प्रारंभ,सुमारे ८०० महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी
3 पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांचे अकरावीला प्रवेश घेण्यासाठी हाल
Just Now!
X