आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध असलेले आणि त्यामुळेच कधी कधी अडचणीत सापडणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात मुलांच्या तुलनेत मुलीच जास्त प्रेमळ असतात, असे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी मला दोन्ही मुलंच झाल्यानंतर तिसरा चान्स घेता आला नाही. पण येणाऱ्या सुना माझ्यासाठी मुलीप्रमाणेच असतील, असे सांगत त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त देशभरात मंगळवारी स्त्री कर्तुत्त्वाला सलाम करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी आलेल्या अजित पवार यांनी बेटी बचाव संकल्पनेवर आधारित एका समूह शिल्पाचे उदघाटन केले. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मुलांपेक्षा मुलीच जास्त प्रेमळ असतात, असे सांगितले. ते म्हणाले, मुलगी जेवढी आई-वडिलांवर प्रेम करते. तेवढं मुलं करत नाहीत. सासरी गेल्यावरही आई-वडिलांचा फोन आला तरी मुलीच्या डोळ्यात पाणी येतं. मात्र, मुलं बायको आली की आई-वडिलांना विसरून जातात. मुलीकडून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत. मला दोन्ही मुलंच झाल्यानंतर तिसरा चान्स घेता आला नाही. पण हरकत नाही. येणाऱ्या सुनांना मी मुलीसारखंच वागवेन, असे त्यांनी सांगितले.

अजित पवार हे कायम आपल्या वेगवेगळ्या विषयांवर स्पष्ट मत मांडण्यामुळे चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री असताना केलेल्या काही विधानांमुळे ते अडचणीतही सापडले होते. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील विविध विकास कामांचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते सध्या करण्यात येते आहे.