राष्ट्रवादीच्या िपपरी बालेकिल्ल्यातील बदलती राजकीय परिस्थिती, पक्षांतर्गत असंतोष आणि स्थायी समितीच्या निवडणुकीवरून वेगळी उलथापालथ होण्याची शक्यता लक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरेपूर खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी आकुर्डीत नगरसेवक व स्थानिक नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
स्थायी समितीच्या आठ जागांसाठी २० फेब्रुवारीला होणारी निवडणूक गुरुवापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामागे राजकीय घडामोडींचे अनेक पैलू आहेत. राष्ट्रवादीत चार जागांसाठी ५७ नगरसेवक इच्छुक आहेत. संधी न मिळाल्यास नगरसेवकांमध्ये कशी नाराजी पसरते, हे अजितदादांना यापूर्वीच्या अनुभवावरून माहिती आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीतील वातावरण सध्या गढूळ असून नगरसेवकांमध्ये स्थानिक नेत्यांविरुद्ध तीव्र खदखद आहे. पक्षांतर्गत बंडाळी होण्याच्या धास्तीनेच शिक्षण मंडळ सभापतींची मुदत संपूनही राजीनामा घेण्यात आला नाही. स्थायीच्या निवडणुकीनंतर वेगळे काही घडेल, अशी धास्ती राष्ट्रवादीत आहे. निवडणुकीत अथवा त्यानंतरही तसे काही होऊ नये, कोणताही धोका उद्भवू नये म्हणून अजितदादांनी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे.