पिंपरी महापालिकेतील चिंचवड-मोहननगरचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा खून झाला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक पुढे आले आहेत. स्वत:चे एक महिन्याचे मानधन टेकवडे यांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जवळपास १० लाख रूपये यातून जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
नगरसेवक टेकवडे यांचा काही दिवसापूर्वी मोहननगर येथे खून झाला. त्यामुळे टेकवडे कुटुंबीयांनी आधार गमावला आहे. आपल्या सहकारी नगरसेवकाच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा विचार काहींनी मांडला, त्यास सर्वपक्षीय सहमती मिळाली. त्यानुसार, पालिका सभेत याबाबतचा प्रस्ताव पक्षनेत्या मंगला कदम यांनी मांडला, त्यास सर्वानी अनुमोदन दिले. पालिकेतील नगरसेवकांची संख्या १२८ असून पाच नगरसेवक स्वीकृत आहेत. त्यांच्या एक महिन्याच्या मानधनाची जवळपास १० लाखाची रक्कम टेकवडे यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.