कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी

पुणे : कडक निर्बंध काहीसे शिथिल झाल्यानंतर पुस्तकांच्या दुकानांमध्ये वाचकांची खरेदीसाठी लगबग वाढली आहे. दुकान सुरू ठेवण्यासाठी दोन तासांचा कालावधी वाढवून मिळाल्याचा उपयोग होईल, असे पुस्तक विक्रे त्यांचे म्हणणे आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये पुस्तकांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाचकांना पुस्तके  खरेदी करता आली नाहीत. १ जूनपासून कडक निर्बंधातून पुस्तकांची दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाली आणि दोन महिन्यांनंतर वाचकांना पुस्तके  खरेदीची संधी मिळाली. मात्र, सकाळी सात ते दुपारी चार ही पुस्तकांच्या दुकानाची वेळ वाचकांच्या सोयीची नाही. त्यात दोन तासांचा कालावधी वाढवून मिळाला तर लाभ होईल अशी अपेक्षा अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर आणि रसिक साहित्यचे शैलेश नांदूरकर यांनी व्यक्त केली.

राठिवडेकर म्हणाले, वाचनाची भूक किती आहे याची प्रचिती गेल्या पाच दिवसांमध्ये आली. दररोज सुमारे २०० याप्रमाणे वाचनप्रेमींनी सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या एक हजारांहून पुस्तकांची खरेदी के ली. कार्यालयातून घरी जाताना पुस्तकांची खरेदी करण्याची ग्राहकांना सवय आहे, त्यामुळे पुस्तकांच्या दुकानाची सध्याची वेळ वाचकांच्या सोयीची नाही. नांदूरकर म्हणाले, पाच दिवसांमध्ये एक हजाराहून अधिक साहित्यप्रेमींनी दुकानाला भेट दिली. सुमारे एक लाख रुपये मूल्य असलेल्या ६०० पुस्तकांची विक्री झाली. पुस्तके  खरेदीची घरपोच सेवा देण्यात येत असली तरी दुकानात येऊन पुस्तके  हाताळून ती खरेदी करण्याची मजा और आहे अशी भावना ग्राहकांनी व्यक्त केली.