ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन

शिक्षण पूर्ण केलेल्या केवळ ४० टक्के तरुणांना नोकरीच्या संधी मिळतात. तर ६० टक्के तरुण नोकरीपासून वंचित राहतात. त्यामुळेच मानव विकास दर लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. हे सद्य:स्थितीतील विदारक चित्र दूर करण्यासाठी संशोधन हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४४ व्या ज्ञानसत्राच्या उद्?घाटनपर व्याख्यानात ‘वेध ज्ञानयुगातील भारताचा’ या विषयावर डॉ. काकोडकर बोलत होते. सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, उपाध्यक्ष सुरेश पिंगळे, कार्यवाह डॉ. गीताली टिळक—मोने, डॉ. मंदार बेडेकर या वेळी उपस्थित होते.

काकोडकर म्हणाले, ज्ञान आणि संशोधन ही विज्ञान युगाची गरज लक्षात घेता केवळ शिक्षण आणि पदव्या घेऊ न चालणार नाही. शैक्षणिक संस्थेतूनच विद्यार्थ्यांना संशोधनाचे बाळकडू मिळाले पाहिजे. तरच आपण ज्ञानयुगात संशोधनाचा आणि मानव विकासाचा आलेख वाढवू शकू. समाज आणि उद्योगाची सांगड शैक्षणिक संस्थातून तुटली असून ती पुन्हा जोडणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दोन तृतीयांश लोक ग्रामीण भागात राहतात. त्यांनाही संशोधनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. देशातील सर्व विद्यापीठांची ९० टक्के क्रयशक्ती केवळ परीक्षा घेण्यासाठी खर्च होते.

ज्ञानयुगाची परिभाषा न समजून घेता आपण जुन्याच पद्धतीने शिक्षण देत राहिल्यास ही शिक्षण पद्धती कालबा होईल. त्यामुळे दहा तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करून त्यांनी संपूर्ण देशासाठी एकाच पेपरची आखणी करावी. विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाव्यात.प्रास्ताविक डॉ. दीपक टिळक यांनी केले, डॉ. मंदार बेडेकर यांनी सूत्रसंचालन, तर अभिषेक घैसास यांनी आभार प्रदर्शन केले.

शिक्षणाची पुनर्रचना आवश्यक

शिक्षण क्षेत्रात २६ कोटी विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना ८५ लाख शिक्षक विद्यादान करतात. तर, उच्च शिक्षण क्षेत्रात साडेतीन कोटी विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना १४ लाख प्राध्यापक मार्गदर्शन करतात. ९० टक्के विद्यार्थी खासगी संस्थेतून उच्च शिक्षण घेतात, तर केवळ दहा टक्के विद्यार्थी शासकीय संस्थांतून शिक्षण घेतात. खासगी शिकवण्यांचे अर्थकारण २.४ लाख कोटींचे आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षणासाठी पुनर्रचना होणे आवश्यक आहे, असेही डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.