गरज ही शोधाची जननी असते याची प्रचिती राहुल रस्तोगी या युवकाला आली. वडिलांना झालेल्या हृदयविकाराच्या त्रासाची कल्पना आल्यानंतर घरच्या घरी ईसीजी (इलेक्ट्रो कार्डिओग्राम) काढता येईल असे काही करू शकतो का, या विचारांतून त्याने अवघ्या १५ सेकंदात ईसीजी काढू शकेल असे ‘संकेत’ हे उपकरण विकसित केले. यामुळे हृदयरुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याचे ‘संकेत’ मिळाले असून या नावीन्यपूर्ण शोधाबद्दल राहुल रस्तोगी याला ‘अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अॅवॉर्ड’ने गौरविण्यात आले.
जगभरातील ९० देशांतून आलेल्या तीनशेहून अधिक अर्जातून राहुल रस्तोगी याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संकेत या ईसीजी डिव्हाईसची निर्मिती करणारा राहुल रस्तोगी हा दिल्लीतील नोएडा येथील रहिवासी. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने आपल्या मनोगतातून या उपकरणाच्या शोधाची कथाच उलगडली.
अडीच वर्षांपूर्वी वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्या वेळी रात्री-अपरात्री रुग्णालयात नेऊन वारंवार त्यांचा ईसीजी काढावा लागायचा. हा ईसीजी घरच्या घरी काढता येईल असे आपण असे काही करू शकतो का, हे मनात आलेले विचार संकेतच्या निर्मितीचे बीजरूप ठरले. संशोधनानंतर मोबाईलवर ईसीजी काढता आला. हा ईसीजी घडी करून काडेपेटीमध्ये ठेवता येईल असा होता. मी अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांनी या संशोधनाचे स्वागत करताना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यानुसार मी या उपकरणामध्ये बदल केले. त्यानुसार केवळ बोटाच्या ठश्याने (थंब इम्प्रेशन) अवघ्या १५ सेकंदामध्ये हा ईसीजी निघू शकतो. ‘एटीएम कार्डा’च्या आकाराच्या या उपकरणाला मोबाईल अॅप्लिकेशन आणि ‘क्लाऊड’ची जोड देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये एक सेन्सरही ठेवण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये नेऊन रुग्णाचा ईसीजी काढण्यामध्ये होणारा वेळेचा अपव्यय संकेत या ईसीजी उपकरणामुळे टाळता येतो. हा ईसीजी एसएमसएस, व्हॉट्स अॅप किंवा ई-मेलच्या माध्यमातून डॉक्टरांना पाठवून उपचाराविषयी मार्गदर्शन घेता येणे सुलभ झाले आहे, असे राहुलने सांगितले.
सध्या या उपकरणाची किंमत १५ हजार रुपये असून भविष्यामध्ये ती १० हजार रुपयांपर्यंत कमी करण्याचा मानस आहे. या उपकरणाला रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि शरीराचे तापमान मोजण्याची यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न आहे. देशभरातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्राथमिक आरोग्यसेवकाकडे हे उपकरण असेल तर, रुग्णाचा ईसीजी लगेच काढून त्याच्यावर तत्काळ उपचार करता यावेत हे स्वप्न साकार करण्याची मनीषा आहे, असे राहुल रस्तोगी याने सांगितले. पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’मध्ये नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल गुप्ता आणि वैशाली माशेलकर यांच्या हस्ते राहुलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आणि माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर या वेळी उपस्थित होते.