अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे संस्थेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. २५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसा.चे अध्यक्ष किरण ठाकूर, नाटय़संगीतातील ज्येष्ठ गायक पं. रामदास कामत, डॉ. दीपक टिळक या वेळी उपस्थित राहणार आहेत.  
रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवेबद्दल संस्थेतर्फे दिला जाणारा भार्गवराम आचरेकर स्मृती पुरस्कार सुनील गोडबोले यांना जाहीर झाला आहे. तर, पन्नास वर्षांहून अधिक काळ केलेल्या नाटय़ सेवेबद्दल मोहन वैद्य यांना ‘बबनराव गोखले पुरस्कार’ प्रदान केला जाईल. संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्दल संजय गोगटे यांना ‘माणिक वर्मा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अभिनेते अविनाश खर्शीकर यांना उत्कृष्ट गद्यनटासाठी दिला जाणारा ‘नटवर्य केशवराव दाते स्मृती पुरस्कार’ तर नाटय़दिग्दर्शक अतुल पेठे यांना ‘पाश्र्वनाथ आळतेकर स्मृती पुरस्कार’ देण्यात येईल. प्रदीप मुळ्ये यांना नेपथ्यासाठी ‘पु. श्री. काळे स्मृती पुरस्कार’ तर अभिनेते हेमंत ढोमे यांना ‘सुनील तारे स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाईल.
या वर्षी संस्थेने दोन नवीन पुरस्कार सुरू केले आहेत. एकपात्री कलाकारांसाठी ‘मधुकर टिल्लू स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार असून या वर्षी हा पुरस्कार सदानंद चांदेकर यांना जाहीर झाला आहे. तर, लोकनाटय़ातील कलाकारांसाठी ‘मधू कडू स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार असून यंदा तो सविता मालपेकर यांना देण्यात येणार आहे.
साकेत राजे, सागर लोधी, सुनील चौधरी, अपूर्वा कुलकर्णी, चंद्रशेखर आफळे, प्रशांत दळवी, डॉ. मधुरा कोरान्न्ो, राकेश घोलप, शैला गुप्ते, राजीव परांजपे, सावनी दातार- कुलकर्णी, तुषार क ऱ्हाडकर, स्वाती देशमुख, प्रमिला शिंदे, मनोहर यादव, माधव अभ्यंकर आदींनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.