पुण्यामधील खेड तालुक्यातील गुळाणी येथे जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी लष्करी अधिकारी सैन्याचा फौजफाटा घेऊन गावात पोहोचल्याची घटना समोर आली आहे. कर्नल केदार गायकवाड ३० ते ४० जवानांना घेऊन गावात आले होते. इतकंच नाही त्यांनी यावेळी शेतात पेरलेल्या सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टरही फिरवला. हातात रायफल घेऊन जवान वावरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. या भीतीपोटी कोणी विरोधही दर्शवण्याची हिमत केली नाही. पोलिसांनी कर्नल केदार गायकवाड यांच्याविरोधात गुम्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिमल विजय गायकवाड यांच्या कुटुंबातील लोकांनी गुळाणी येथील जमीन दिलीप नामदेव भरणे (रा.माण, ता. मुळशी) यांना विकली होती. २०१८ मध्ये हा जमिनीचा व्यवहार झाला होता. मात्र गायकवाड कुटुंबीयांनी जमिनीवर दावा केला असून सध्या दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

दरम्यान २२ जून रोजी परिमल गायकवाड यांचे भाऊ कर्नल केदार गायकवाड चार लष्कराच्या गाड्यांमधून ३० ते ४० जवानांना घेऊम गावात पोहोचले होते. केदार गायकवाड हातात रायफल्स घेतलेल्या जवानांसोबत गावात फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर त्यांनी जवानांसह भरणे यांच्या शेतजमिनीत ट्रॅक्टर फिरवत मशागत करण्यास सुरुवात केली. जवळपास तीन ते चार तास सुरु असलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थ चांगलेच घाबरले होते.