प्रथमेश गोडबोले

पौड रस्त्यावर आनंदनगर पार्क सोसायटी आहे. सोसायटी अंतर्गत ज्येष्ठ नागरिक मंडळ, महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांच्या माध्यमातून वर्षभर विविध सण, उत्सवांबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले जाते. याबरोबरच सोसायटीचा स्वत:चा जॉगिंग ट्रॅक, बालोद्यान, बॅडमिंटन आणि मिनी हॉल आहे. सोसायटीकडून सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने अत्यल्प दरात दवाखाना चालवला जातो. या शिवाय सोसायटीत दासबोध उपासना केंद्रही चालवले जाते. अनेक वर्षांपासून एकत्र राहत असल्याने सभासदांमध्ये एकोपा आणि कुटुंबाची भावना आहे.

पौड रस्त्यावर आनंदनगर पार्क सोसायटी आहे. सोसायटीमध्ये २३ इमारती असून ४८८ सदनिका आहेत. सोसायटी अंतर्गत आनंदनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे. या मंडळाची स्थापना २६ मार्च १९९८ रोजी करण्यात आली, तेव्हापासून या मंडळाचे काम अव्याहत सुरू आहे. या मंडळाच्या माध्यमातून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोसायटीच्या मिनी हॉलमध्ये सर्व सभासद उत्साहाने एकत्र येतात. विविध कलागुणांना वाव देत प्रत्येक सभासदाला कार्यक्रमात उस्फूर्त भाग घ्यायला लावून कार्यक्रमाची रंगत वाढवली जाते. सणांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार महिला सभासदांकडून कार्यक्रम सादर केले जातात आणि या कार्यक्रमांना सोसायटीचा प्रत्येक सभासद उपस्थिती लावतो. या मंडळाकडून सोसायटीमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले जाते. मंडळाला साहाय्यभूत ठरणाऱ्या सभासदांचा वेळोवेळी सत्कारही करण्यात येतो. तसेच आनंदनगर आणि आसपास राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मंडळाला भेट देण्याचे आवाहनही या मंडळाकडून केले जाते. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त सोसायटीमध्ये झेंडावंदन केले जाते. दिवाळीमध्ये सोसायटीमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. नवरात्रात गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते.

सोसायटीमध्ये चालण्याच्या व्यायामासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी मदत केली आहे. सोसायटीच्या बालोद्यानातील जुनी खेळणी खराब झाल्यामुळे नवीन खेळणी बसवण्यात आली आहेत. सोसायटीचा बॅडमिंटन हॉल आहे. या हॉलचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. याबरोबरच सोसायटीच्या मिनी हॉलचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. नवीन हॉल बांधताना दोन स्वच्छतागृहे आणि एक ड्रेसिंग रूम तयार करण्यात आली आहे. सोसायटीमधील बालक्रीडांगणाच्या पुढील जागेत ब्लॉक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात कार्यक्रमांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सोसायटीमध्ये सुरक्षेसाठी मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर तसेच बॅडमिंटन हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सोसायटीत अनेक इमारतींमधील रहिवाशांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नव्हते. त्यासाठी सोसायटीमध्ये दोन जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत जलवाहिनीचे समान विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे. या शिवाय आनंदनगर पार्क सेवा संस्थेतर्फे बॅडमिंटन, महिलांसाठी योगासने, मुलांसाठी मलखांब आणि योगासने, श्रीमद् दासबोध उपासना केंद्र, स्नेहसेवा विनामूल्य दवाखाना इत्यादी उपक्रम राबवले जातात. तसेच समाजोपयोगी आणि धार्मिक उपक्रमही सोसायटीकडून केले जातात. सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. सोसायटीकडून अनेक वर्षांपासून अत्यल्प दरात दवाखाना चालवला जातो. दासबोध उपासना केंद्र चालवले जाते. सामाजिक कामांनाही सोसायटीच्या सदस्यांकडून हातभार लावला जातो. सोसायटीच्या परिसरात खुली व्यायामशाळा तयार करण्यात आली असून त्याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे.

सोसायटीमध्ये आनंदी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता महिला मंडळ भरते. दूरचित्रवाणी संचावर दैनंदिन मालिकांचे पेव फुटले आहे. परिणामी महिला मंडळांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, सोसायटीच्या महिला मंडळाने यावर मात केली आहे. काहीही झाले तरी, मंडळाचे उपक्रम सुरू ठेवायचेच असे ठरवून सोसायटीमधील महिला छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करतात. ज्यांना ज्या गोष्टींची आवड असेल तसे कार्यक्रम केले जातात. वाचन, गाणे म्हणणे, भजन, भावगीत म्हणणे, वाचलेल्या पुस्तकातील आवडलेला उतारा वाचून दाखवणे, नव्या पाककृती सांगणे, वृत्तपत्रांमधील एखाद्या बातमीवर आपली मते मांडणे असे विविध कार्यक्रम या मंडळाकडून आयोजित केले जातात. घरातील तरुण पिढी कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असते. त्यादृष्टीने स्वत:चा एकटेपणा घालवून मनमोकळेपणाने गप्पा मारण्याची जागा म्हणजे आनंदी महिला मंडळ आहे. या मंडळाकडून सोसायटीमधील महिलांचे वाढदिवसही साजरे केले जातात. सोसायटीमधील काही सदस्य गिर्यारोहणासाठी देखील जातात.

गणेशोत्सवातील सर्वच दिवस सोसायटीमध्ये विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन केले जाते. पहिल्या दिवशी श्रींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतरच्या दिवसांत तंबोला, संगीत खुर्ची, अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, विविध क्रीडा, चित्रकला, नृत्य आणि पाककला स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. ज्ञानप्रबोधिनी शाळेकडून विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. मान्यवरांचे इतिहासपर व्याख्यान आयोजित केले जाते. फनफेअर, विविध गुणदर्शन, अंताक्षरीचेही आयोजन केले जाते. गणेशोत्सवात स्थिर वादनासाठी विविध मंडळांना सोसायटीमध्ये कला सादर करण्याची संधी दिली जाते. ऑर्केस्ट्रा आणि या स्पर्धाचा पारितोषिक वितरण कार्यक्रम होतो. अनंत चतुर्दशीदिवशी श्रींची विसर्जन मिरवणूक काढून गणेशोत्सवाची सांगता होते. उत्कृष्ट गणेशोत्सव साजरा करत असल्याबद्दल पुणे महानगरपालिका, विघ्नहर्ता न्यास, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे फेस्टिव्हल यांच्यातर्फे देखावा तसेच मिरवणुकीसाठी सोसायटीला विविध पुरस्कारही मिळाले आहेत.