देखाव्यांसाठी काम करणाऱ्या कलाकार-तंत्रज्ञांची भावना

अस्तित्वासाठी धावा

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : साधेपणाने साजरा होत असलेल्या यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखाव्यांसाठी काम करून गणरायाच्या चरणी सेवा रुजू करता आली नाही, याची खंत कलाकार आणि तंत्रज्ञांनी व्यक्त केली. करोना निमित्त असून इतकी वर्षे काम केल्यानंतर यंदा शांत बसून राहावे अशीच गणरायाची इच्छा असावी, याकडे या कलाकारांनी लक्ष वेधले.

दहीहंडी उत्सवापासून सुरू होणारी कार्यकर्त्यांची लगबग गणेशोत्सवाची चाहूल देत असते. ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक देखावा असला तरी त्याचे संहितालेखन कोणी करायचे, ध्वनिमुद्रण करताना कोणत्या कलाकारांच्या आवाजाचा वापर करायचा याची चर्चा रंगू लागते. त्यानुसार कार्यवाही करून गणेशोत्सवापूर्वी देखाव्याची माहिती देणाऱ्या ध्वनिमुद्रित सीडीची निर्मिती केली जाते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना कलाविष्काराची संधी देण्याबरोबरच त्यांना हमखास मिळणारे उत्पन्नाचे साधनही हिरावून घेतले गेले आहे.

गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय मंडळांनी घेतल्यामुळे यंदा आमच्याकडे एकाही मंडळाच्या देखाव्याच्या ध्वनिमुद्रणाचे काम आले नाही. त्यामुळे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली, असे ‘स्टुडिओ एलकॅम’चे संचालक प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. पुण्यातील मंडळांसह नाशिक, सिन्नर, इंदापूर, टेंभुर्णी आणि कुर्डुवाडी येथील मंडळे अशा ३५ ते ४० मंडळांच्या देखाव्यांची माहिती देणाऱ्या ध्वनिमुद्रणाचे काम असते. प्रत्येक मंडळाच्या सीडीची निर्मिती करण्यासाठी ५ हजार रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अनेक मंडळे या सीडीच्या आधारे जिवंत देखावे सादर करतात. या देखाव्यात काम करणाऱ्या कलाकारांनाही यंदा करोनामुळे काम नाही. संहितालेखन करणारे कलाकार, देखाव्याची माहिती देण्यासाठी आवाज देणारे कलाकार असे सर्व निवांत बसून आहेत, असे पायगुडे यांनी सांगितले.

गेल्या तीन दशकांपासून मी गणेशोत्सवामध्ये विविध मंडळांतर्फे सादर केल्या जाणाऱ्या देखाव्यांसाठी संहिता लेखन करतो आहे. पण, करोनामुळे अशा स्वरूपाची शांतता यंदा प्रथमच अनुभवली, असे ज्येष्ठ संहितालेखक हृषीकेश परांजपे यांनी सांगितले. देशभक्तीपर देखाव्यांपासून ते सामाजिक प्रबोधन करणाऱ्या देखाव्यांच्या सुमारे दोन हजारांहून अधिक संहितालेखनाचे काम केले आहे. या वर्षी एकाही मंडळाकडून विचारणा झालेली नाही. दरवर्षी कामासाठी २४ तास अपुरे पडायचे. यंदा कामच नसल्याने निवांत आहे. शासनाच्या आरोग्यविषयक धोरणांना सर्वच मंडळांनी प्रतिसाद दिला ही चांगली गोष्ट आहे, असे परांजपे यांनी सांगितले.