कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी च्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षाला गुन्हे शाखा एकच्या पथकाने जेरबंद केलं आहे. चरण बाळासाहेब ठाकर वय- २६ अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे १ गावठी पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. राजू परदेशी आणि प्रदीप खांडगे अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी-केळगाव रोडवर आरोपी चरण हा पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा दोन च्या पथकाला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने इंद्रायणी रुग्णालयाच्या शेजारी सापळा लावून आरोपी चरण ला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसे जप्त केले आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केल्यानंतर चरण ला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गावठी पिस्तुल कुठून आणले त्या व्यक्तीचे नाव सांगितले. तेव्हा, गुन्हे शाखा एकच्या कर्मचाऱ्यांनी प्रदीप खांडगे रा.मावळ याला अटक केली. त्याने मध्यप्रदेश येथून दोन गावठी पिस्तुल आणले होते. पैकी आरोपी चरण याला एक तर दुसरे पिस्तुल राजू परदेशी याला विकले होते. राजू याला लोणावळा येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. संबंधित कारवाई गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील,गणेश सावंत,सचिन उगले या कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली आहे.