महापालिकेतील गटनेता बदलण्याचा निर्णय शिवसेनेने अवघ्या तीन दिवसात बदलला असून या पदावर पुन्हा अशोक हरणावळ यांची नियुक्ती सोमवारी करण्यात आली.
शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावर श्याम देशपांडे आणि अजय भोसले यांची नियुक्ती करतानाच महापालिका गटनेता पदावर प्रशांत बधे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्या शनिवारी करण्यात आल्या. मात्र, गटनेता बदलण्याचा निर्णय तीनच दिवसात पुन्हा बदलण्यात आला आहे. बधे यांच्याऐवजी हरणावळ यांची पुन्हा या पदावर सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र पुणे शहर संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर यांनी हरणावळ यांना दिले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा प्रकल्प मी हाती घेतला असून तो पूर्णत्वाला जाईपर्यंत गटनेता पदावर राहण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती हरणावळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार हरणावळ यांची विनंती मान्य करण्यात आली आणि मुदतवाढ दिली जात असल्याचे पत्र कीर्तिकर यांनी त्यांना दिले. कलादालनाचा हा प्रकल्प एप्रिल २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी हरणावळ यांची नियुक्ती केल्याची बातमी पक्षवर्तुळात दुपारीच पसरली. त्यानंतर नव्याने नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी महापालिकेत आले होते. पक्षाने गटनेता म्हणून जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करीन, असे हरणावळ यांनी सांगितले.