‘आठवलेज्’ हे नाव कानावर पडले की त्यांच्या स्वादिष्ट गोड वडय़ाच आठवतात. पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळणारा हा व्यवसाय फक्त वडय़ांपुरताच मर्यादित राहिला नाही. खाऱ्या पदार्थामध्येही आठवलेंची उत्पादने लोकप्रिय होऊ लागली. सिंहगड रस्त्यावरील जागेत तयार होणारी ही खाद्य उत्पादने ‘ऑनलाईन’ संकेतस्थळाच्या माध्यमातून देशभर पोहोचली आहेत. इतकेच नव्हे, तर परदेशातही अनेक ठिकाणी आठवलेंच्या वडय़ा आणि गोडाच्या पोळ्या खवैयांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

गोड वडय़ांपासून भोपळ्याच्या घारग्यांपर्यंत

गोड वडय़ा खवैयांसाठी नव्या नाहीत. तरी जांभूळ वडी किंवा सीताफळ वडी ही नावे ऐकली की ‘उगाच थोडासा जांभळाचा किंवा सीताफळाचा स्वाद वापरला असेल, बाकी वडी काजूचीच!,’ असा नव्या माणसाचा समज होऊ शकतो. ‘आठवलेज्’च्या वडय़ांची चव घेतल्यानंतर मात्र काजूबरोबर अगदी लीलया एकत्र झालेला जांभूळ किंवा सीताफळाचा नैसर्गिक स्वाद जीभ खूश करून जातो. ‘गोड वडय़ावाले आठवले’ म्हणून विशेष ओळख प्राप्त झालेल्या ‘आठवलेज्’चा संपूर्ण व्यवसाय पुण्यातून चालतो. अगदी घरगुती स्वरूपात सुरू झालेल्या या व्यवसायाने चांगले यश तर मिळवलेच, परंतु देशभर आणि परदेशातही खवैयांची पसंती मिळवली.

आठवले कुटुंब मूळचे मुंबईचे. १९७० मध्ये पुरुषोत्तम गणेश आठवले आणि त्यांच्या पत्नी सुशीला यांनी जोडव्यवसाय म्हणून काजूवडी आणि लाडूंची विक्री करण्याचे ठरवले. दिवसाला दोन किलो ते वीस किलो अशा लहान प्रमाणात हा व्यवसाय सुरू झाला. त्यांचे पुत्र मिलिंद आठवले यांना १९७८ मध्ये पुण्यात ‘टेल्को’मध्ये ‘अ‍ॅपरेंटिस’ म्हणून नोकरी मिळाली. मिलिंद पुण्यात राहू लागल्यानंतर आठवले दांपत्यही येथेच स्थायिक झाले. त्यांचा वडय़ा-लाडूंचा व्यवसाय पुण्यात १९८६ पासून पुन्हा सुरू झाला. बेडेकर मिसळ, बेहेरे आंबेवाले आणि देसाई आंबेवाले हे त्यांचे पुण्यातील पहिले ग्राहक. तेव्हाही पुरुषोत्तम व सुशीला आठवले हेच व्यवसाय पाहात होते. मिलिंद यांनी १९९९ पासून त्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. परंतु त्यापूर्वी सुटीच्या दिवशी ते घरोघरी जाऊन माल विकत. त्यांच्या पत्नी मैत्रेयी यांनी व्यवसायात पुढाकार घेतला होताच, शिवाय मुलगा शंतनू यालाही सुरुवातीपासून घरच्या व्यवसायात रस होता. ‘सुशीला गृह उद्योग’ या नावाने हा व्यवसाय सुरू झाला आणि नंतर ‘आठवलेज्’ हे ‘ब्रँड नेम’ आले.

‘आठवलेज्’चे संपूर्ण उत्पादन त्यांच्या सिंहगड रस्त्यावरील जागेत होते. २००६ मध्ये त्यांनी केवळ एका दुकानाची जागा घेतली होती. आधी तिथे चिवडा उत्पादन सुरू करण्याचे ठरले. हळूहळू उत्पादनांची संख्या वाढत गेली आणि आता सिंहगड रस्त्यावरच सात दुकानांच्या जागेत उत्पादन सुरू आहे. या ठिकाणी ते किरकोळ विक्रीही करतात. खरेदीस आलेल्या ग्राहकांना  ‘आठवलेज्’चे वेगवेगळे पदार्थ बनताना सहज दिसतात. तितका खुलेपणा त्यांनी ठेवला आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या गोड वडय़ा ही आठवलेंची ओळख. आधी केवळ काजू आणि आंबा वडी विकली जाई. आता ते तेरा प्रकारच्या गोड वडय़ा बनवतात. विशेष म्हणजे यातील काही वडय़ा केवळ बाहेर कुठे सहसा मिळतही नाहीत. घरातील मंडळींनीच प्रयोग करून आणि लोकांचे अभिप्राय घेत ही नवी उत्पादने सुरू केली. आठवलेंच्या वडय़ा म्हणून विशेष प्रसिद्ध असणाऱ्या वडय़ांमध्ये जांभूळ वडी आणि सीताफळ वडीचा उल्लेख करावाच लागेल. खरे तर जांभूळ वडीबरोबर त्यांनी चिकू वडीही बनवली होती. जांभूळ वडीपेक्षा चिकूची वडी अधिक खपेल असा त्यांचा कयास होता. प्रत्यक्षात जांभळाच्या वडीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. श्रीखंड वडी, आम्रखंड वडी, आंबा वडी, उपवास वडी अशा काही वडय़ा सोडता त्यांच्या बहुतेक वडय़ांमध्ये काजुपूड वापरली जाते. ‘जांभूळ वडीमध्ये जांभूळ, काजू आणि साखरेव्यतिरिक्त कृत्रिम रंग, वास वगैरे वापरले जात नाही. सीताफळ आणि अंजीर वडीचेही तसेच आहे. ‘प्रीझव्‍‌र्हेटिव्ह’ देखील वापरली जात नाहीत. जांभळाचा हंगाम नसताना ‘फ्रोजन’ जांभूळ वापरले जाते. काही वेळा जांभळाचा नैसर्गिक रंगच खूप छान जांभळा नसतो. तसे झाले तरी आम्ही कृत्रिम रंग वा स्वाद घालत नाही,’ असे शंतनू सांगतात. असाच आणखी एक पदार्थ म्हणजे भोपळ्याचे घारगे. घरोघरी हा पदार्थ बनतो, पण आठवलेंचे घारगे तितकेच लोकप्रिय आहेत. महिन्याला ते जवळपास एक टन भोपळा घारगे विकतात. मैत्रेयी यांच्या प्रयत्नांतून हे उत्पादन सुरू झाले. लोकांच्या आवडीनुसार आणि मागणीनुसार चिवडा, मेथी मठरी, पातळ पोहे व मुरमुरा चिवडा, भाजणी चकली, ज्वारी चकली, वेगवेगळ्या चवींचे शंकरपाळे असे तिखट पदार्थही त्यांनी सुरू केले. सणांच्या निमित्ताने तिळवडी आणि गुळपोळी हे त्यांचे पदार्थ प्रचंड खपतात. संक्रांतीला ते दिवसाला सहा हजार गूळपोळ्या बनवतात.

सध्या पुण्यात जवळपास शंभर दुकानांमध्ये त्यांचा माल ठेवला जातो. नागपूर, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, अमरावती येथेही त्यांची उत्पादने जातात. ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरून ते देशभर माल पुरवतातच, शिवाय ऑस्ट्रेलिया, अ‍ॅटलांटा, दुबई, आबुधाबी, कॅलिफोर्निया, बोस्टन, रॉचेस्टर अशा ठिकाणीही त्यांचे पदार्थ गेले आहेत. आता स्वत:ची वितरकांची साखळी तयार करण्यावर त्यांचा भर असून लवकरच ताज्या ‘स्नॅक्स’ पदार्थाच्या व्यवसायात त्यांना यायचे आहे.

sampada.sovani@expressindia.com