पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य रघुनाथ गौडा यांचा भाऊ बाळासाहेब गौडा यांच्यावर रविवारी रात्री पर्वती दर्शन परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला. पाच ते सात जणांच्या टोळक्याने कोयता आणि तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास सनी सोनावणे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांनी बाळासाहेब गौडा यांच्यावर कोयता आणि तलवारीने वार केले. त्यानंतर हे सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने गौडा यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याच शक्यता वर्तविण्यात येते आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सनी सोनावणे याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.