महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विविध प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांकडून साक्षांकित प्रतींची किंवा प्रतिज्ञापत्राची मागणी करू नये, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना केल्या आहेत.
विद्यापीठे किंवा महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किंवा दाखले, कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जन्मदाखला, जातीचे प्रमाणपत्र अशा काही कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागतात. मात्र, बहुतेकवेळा साक्षांकित छायाप्रती देण्याची सक्ती शिक्षण संस्थांकडून करण्यात येते. मात्र, प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी साक्षांकित प्रती किंवा प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात येऊ नये, अशी शिफारस प्रशासकीय पुनर्रचना समितीने केली आहे.
त्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून साक्षांकित छायाप्रत मागण्यात येऊ नये. छायाप्रतीवर स्वत:ची स्वाक्षरी करून विद्यार्थी ती सादर करू शकतात. मात्र, त्या वेळी सगळी मूळ कागदपत्रे दाखवणे आवश्यक असल्याचे आयोगाने सांगितले आहे. प्रतिज्ञापत्र घेण्याची पद्धत बंद करण्यात येऊन त्याच्या अंमलबजावणीचा अहवालही विद्यापीठे आणि महाविद्यालयांना येत्या आठ दिवसांत सादर करायचा आहे. याबाबत आयोगाकडून सर्व विद्यापीठांना पत्र पाठवण्यात आले आहे.