शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संके तस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.

पवित्र संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार, ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने काही उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता आलेले नाहीत. मात्र आता खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण श्रेणी आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. अकरावी, बारावीत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. परंतु असे उमेदवारांना पदव्युतर पदवीला किमान द्वितीय श्रेणी असेल आणि त्याची नोंद पवित्र संकेतस्थळावर केली असल्यास त्यांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. नववी, दहावी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण; पण ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने प्राधान्यक्रम देता न आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देता येतील. वयाच्या नियमामुळे प्राधान्यक्रम देऊ न शकलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम नोंद केल्यानंतर भरता येतील. उमेदवारांना समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येणार आहे. जून २०१९ पूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित के लेल्या उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही. त्यांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची सूचना पवित्र संके तस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान पवित्र संकेतस्थळावर प्रशासकीय सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. आता तरी शिक्षण विभागाने तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.