फसव्या जाहिराती आणि दिशाभूल करणाऱ्या योजनांच्या भूलभुलैय्यामध्ये ग्राहक रोजच फसवला जात असून अशा वातावरणात ग्राहक जागरुक राहिला तरच तो राजा ठरेल अन्यथा ग्राहकांचे शोषण होतच राहील, असे सध्याच्या बाजारपेठेचे चित्र आहे. ग्राहकांसाठी असलेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अत्यंत साधा व सोपा आहे. न्यायमंचाचे कामही अत्यंत सोप्या पद्धतीचे व बिनखर्चाचे आहे. मात्र ग्राहकांच्या दृष्टीने अशा अत्यंत उपयोगी विषयाबाबतही ग्राहक उदासीनच असल्याचा या क्षेत्रात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांचा अनुभव आहे.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा अत्यंत सक्षम असा ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी संसदेत मंजूर झाला. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस ‘भारताचा ग्राहक दिन’ म्हणून देशात साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात येऊन आता तीस वर्षे होत आहेत. तरीही ग्राहकांची फसवणूक आणि आर्थिक शोषण थांबलेले नाही, उलट ते वाढले आहे, असा अनुभव ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’चे ज्येष्ठ पदाधिकारी विलास लेले यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. ग्राहकांची फसवणूक मोठय़ा प्रमाणात आणि लहानसहान व्यवहारांपासून ते मोठय़ा व्यवहारांपर्यंत सर्व ठिकाणी होत असली तरी ऐंशी ते नव्वद टक्के ग्राहकांना त्याची जाणीवच नाही,  असेही लेले यांनी सांगितले.
ग्राहकांवर अन्याय झाला, त्यांची फसवणूक झाली तर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक मंचाकडे दाद मागता येते. न्यायमंचाचे कामही अत्यंत साधे, सोपे व बिनखर्चाचे आहे. न्यायमंचाचे सर्व कामकाज आपण केलेल्या लेखी पत्रव्यवहारावरच चालते. तेथे वकील देण्याची आवश्यकता नसते. ज्या ग्राहकाने खटला दाखल केला असेल तो ग्राहक स्वत:च हा खटला चालवू शकतो. ग्राहक न्याय मंच देशभरात आहेत. मात्र ग्राहकहितासारख्या उपयुक्त व महत्त्वाच्या विषयाबाबत ग्राहक उदासीन आहेत, असाही लेले यांचा अनुभव आहे.
कोणताही उत्पादक कोणतीही गोष्ट कधीही फुकट देत नाही. त्यामुळे एकावर एक फ्री ही दिशाभूल असते. बक्षिसांची आणि सवलतींची खैरात फक्त सणासुदीच्या काळातच का असते, अशा गोष्टींचा ग्राहक विचार करत नाहीत. जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या अनेक कंपन्या ग्राहकांना दर्जेदार वस्तू देत नाहीत आणि विक्रीपश्चात सेवाही देत नाहीत. म्हणून ग्राहकांनी कोणत्याही स्वरुपाची खरेदी करण्यापूर्वी वस्तू व कंपनीविषयी सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. वस्तूचे उत्पादन कोठे होते, विक्रीपश्चात सेवा कोण व कशी देणार आहे, त्यासाठीची जबाबदारी कोणाची असेल, त्यांचे नाव, गाव, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक ही माहिती घेऊन नंतरच कोणतीही खरेदी करणे ग्राहकांच्या हिताचे आहे, असेही लेले यांनी सांगितले. अशी माहिती अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना दिली जात नाही. ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून कंपन्या त्यांच्या सोयीचे नियम व अटी तयार करतात आणि ते ग्राहकांवर लादतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ग्राहक संघटित झाले पाहिजेत, जागरुक राहिले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.