पुस्तकहंडी, गोष्टी मागची गोष्ट, बालचित्रकारांचे चित्रप्रदर्शन, कवितावाचन आणि कथाकथन अशा विविध कार्यक्रमांची रौप्यमहोत्सवी बालकुमार साहित्य संमेलनामध्ये बालकुमारांना मेजवानी लाभणार आहे. शुक्रवारपासून (२९ नोव्हेंबर) तीन दिवस रंगणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे.
संवाद पुणे संस्थेतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संस्थेचे सुनील महाजन आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘चिंटू’कार प्रभाकर वाडेकर, दुसऱ्या प्रवेशद्वाराला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक यांचे तर, मुख्य ग्रंथप्रदर्शनाला ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ कवी िवदा करंदीकर यांचे नाव देण्यात येणार आहे. संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवशाहिरांसह संमेलनाध्यक्ष राजीव तांबे, स्वागताध्यक्ष दिलीप वारे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य उपस्थित राहणार आहेत. संमेलनातील विविध कार्यक्रमांमध्ये भारत सासणे, शंकर सारडा, संध्या टाकसाळे, रेणू दांडेकर, शोभा भागवत, बाबा भांड, माधुरी सहस्रबुद्धे, विनोद शिरसाठ, डॉ. मंदा खांडगे आणि स्वाती राजे सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्यानिमित्ताने गमभन प्रकाशच्या सहकार्याने २८ नोव्हेंबरपासून ११०० बालचित्रकारांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालन येथे चार दिवस हे प्रदर्शन खुले राहणार आहे. उद्घाटनापूर्वी अप्पा बळवंत चौकातील नूमवि प्रशाला ते बालगंधर्व रंगमंदिर हे संमेलनस्थळ या मार्गावर ग्रंथिदडी काढण्यात येणार आहे. मराठी भाषेचे प्रभावी अध्यापन या विषयावर शिक्षकांसाठी कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, महापालिकेच्या २५ शाळांमध्ये कथाकथन, कवितेच्या गावा जावे, बालसाहित्याची वैशिष्टय़े आणि उपक्रमशीलता असे कार्यक्रम होणार आहेत. समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशातून दृष्टिहीन मुलांचे ‘संगीत शारदा’ नाटकातील प्रवेशाचे वाचन, ‘आपलं घर’ संस्थेतील मुलांची पुस्तकहंडी हे उपक्रम होणार आहेत.